अजित पवार यांचा शपथविधी आणि ‘हा’ नेता म्हणाला, ‘औकातीत रहावं…’
आजच्या विस्ताराबाबत मला भाजपने कोणतीही पूर्व सूचना दिली नाही. या विस्ताराबाबत मला तुमच्याकडूनच माहिती मिळाली. अजित दादांना प्रशासनाचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे भलं करावं. सामान्यांचे, सुशिक्षितांचे भलं करावं.
परभणी : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब केला. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार यांनी दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यमंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून दुपारी शपथ घेतली. यामुळे राज्यात आता शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा तिन्ही पक्षाचे मिळून एकत्र सरकार झाले आहे. मात्र, अजित पवार यांच्या ‘या’ नव्या भूमिकेमुळे एका नेत्याने नाराजी व्यक्त करत भाजपवर टीका केली आहे. भाजपने आधी शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी फोडली. त्यांचे सरकार बनवणे सुरू आहे तर मी माझी तयारी करत आहे असे हा नेता म्हणाला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. भाजपने त्यांना विधान परिषदेची आमदारकी देत मंत्रिमंडळातही स्थान दिले होते. परंतु, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महादेव जानकर यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे जानकर सध्या नाराज आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात महादेव जानकर यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, अजित पवार यांच्यासह ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे या शक्यताही धूसर झाल्या आहेत. त्यामुळे नाराज जानकर यांनी भाजपवर टीका केली आहे.
आजच्या विस्ताराबाबत मला भाजपने कोणतीही पूर्व सूचना दिली नाही. या विस्ताराबाबत मला तुमच्याकडूनच माहिती मिळाली. अजित दादांना प्रशासनाचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे भलं करावं. सामान्यांचे, सुशिक्षितांचे भलं करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मला कोणत्याही पक्षाने ऑफर दिलेली नाही. प्रेम आणि राजकारणात सगळं चालत असतं. माझा स्वतःचा पक्ष आहे त्यामुळे मी आयुष्यात राष्ट्रवादीकडून लढणार नाही. मात्र, मी अलायन्स कोणासोबतही करू शकतो असे जानकर यांनी स्पष्ट केले.
आपल्या औकातीत रहावे
भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मास लीडरला पुढे करत नाही. आज बसलेला माणूस उद्या कुठे जाईल ते सांगता येत नाही. आमची तयारी चालू आहे. परभणी लोकसभा मी लढवणार आहे. त्यांचा पक्ष मोठा झाला की ते लहान पक्षांना विचारत नाही. आम्ही आमचा पक्ष वाढवतोय. मी माझी ताकद वाढवली तर भाजप मला विचारेल. त्यामुळे आपण आपल्या औकातीत रहावे, असे जानकर म्हणाले आहेत.
पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे. मात्र, ती एका पक्षाची महासचिव आहे. त्या नाराज आहेत की नाही हे मला विचारण्यापेक्षा फडणवीस आणि बावनकुळे यांना विचारा. सगळ्या जगाला माहित आहे पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत आहे. पंकजा मुंडे यांना राजकारणाची प्रगल्भता आहे त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा यासाठी त्या सक्षम आहेत असेही जानकर यांनी सांगितले.