अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या; म्हणाले, पीएचडी करून काय दिवे लावणार?
Ajit Pawar on PhD Student in Vidhav Parishad Winter Session 2023 : विधानपरिषदेत बोलताना अजित पवार यांनी पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत एक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. वाचा सविस्तर...
नागपूर | 13 डिसेंबर 2023 : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. विविध मुद्द्यांवर सभागृहात चर्चा होत आहे. विविध विधेयकं, प्रस्ताव मांडले जात आहेत. अशातच पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. सारथी, महाज्योती, बार्टी या संस्थांमध्ये आम्हाला पीएचडी करण्यासाठी अॅडमिशन द्या, शिष्यवृत्ती द्या, अशी मागणी केली जात आहे. त्याची संख्या एवढी वाढली की एवढ्या विद्यार्थांना पीएचडीसाठी शिष्यवृत्ती देणं गरजेचं आहे का? अशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर सारथीमध्ये 200 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणासाठी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांचं बोलून झाल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी अजित पवारांना काही प्रश्न विचारले. फेलोशिपसाठी 29 मार्चला जाहीरात प्रसिद्ध केली. त्यात कोणतीही अट नव्हती. त्यानंतर सहा महिन्याने 200 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची आपण अट टाकली. त्याआधी 1300 विद्यार्थ्यांनी फेलोशिपसाठी अर्ज केले. फेलोशिप मिळेल, अशी त्यांना आशा होती. त्यामुळे 200 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची अट आपण पुढच्या वर्षीपासून लागू करावी, अशी विनंती आहे, असं सतेज पाटील म्हणाले. तेव्हा त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं. फेलोशिप घेऊन काय करणार? त्यावर फेलोशिप घेऊन पीएचडी घेतील ना, असं सतेज पाटलांनी म्हटलं. पीएचडी करून काय करणार आहेत? काय दिवा लावणार आहेत? असा प्रतिसवाल अजित पवार यांनी केला. त्यावर असं कसं म्हणता दादा?, असं सतेज पाटील म्हणाले.
विद्यार्थांकडून निषेध
अजित पवार यांच्याविरोधात शिवाजी विद्यापीठातील पीएचडी अभ्यासक विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पीएचडी अभ्यासक विद्यार्थ्यी अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य गेट जवळ समोर घोषणाबाजी करत केला अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. सारथी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी पीएचडी करून दिवे लावणार आहेत का? असं वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.
रोहित पवारांची टीका
अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. युवकांवर कुणी शंका घेता कामा नये. ज्या मुलांकडे क्षमता आहे, बुद्धिमत्ता आहे. पण पैसा नाही, म्हणून ही मुलं सरकारच्या स्कॉलरशीपवर शिकत असतील. तर त्यावर कुणी शंका घेऊ नये. अजितदादा जे बोलले त्याचा निषेध मी करतो, असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
राऊतांचं एका वाक्यात उत्तर
अजित पवार यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळच्या पत्रकार परिषदेत राऊतांना या विषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं. पंतप्रधानन मोदींनी सांगितलं आहे की पकोडे तळा, असं संजय राऊत म्हणालेत.