लोकसभा निवडणुकीवेळी पुणे शहर आणि जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली. यात नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला. त्यावरून महाराष्ट्रभरात वातावरण तापलं अन् त्याचा परिणाम लोकसभेच्या निकालात दिसून आला. महायुती आणि विशेषत: राष्ट्रवादी अजित पवार गटाला याचा मोठा फटका बसला. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं. मागच्या वेळेस जे काही घडले ते सगळे गंगेला मिळालं. झालं गेलं गंगेला मिळालं, असं अजित पवार म्हणाले.
मागच्या वेळेस जे काही घडले ते सगळे गंगेला मिळालं आहे. झालं गेलं गंगेला मिळालं… आता आम्ही फक्त विकासावरच बोलणार आहोत. महायुतीतील मुद्यांवर अंतर्गत चर्चा होईल, असं अजित पवार म्हणाले. शिर्डीमध्ये जात अजित पवार यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ज्यांची स्वप्न पूर्ण होत नाहीत, त्यांचे आत्मे भटकत राहतात. भाजप- शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर त्यावेळीही तो आत्मा त्या सरकारला अस्थिर करत होता. फक्त राज्यालाच नव्हे तर देशाला अस्थिर करण्याचं काम ही आत्मा करत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. पुण्यात येऊन नरेंद्र मोदींनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हणणं लोकांना आवडलं नाही. भटकती आत्मा आता तुम्हाला सोडणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं होतं. याच सगळ्याचा परिणाम लोकसभेच्या निकालावर झाला.
आमच्या यात्रेच्या रूटवर जी श्रद्धा स्थान येणार आहेत. तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतो. आज सिन्नर आणि कोपरगाव ला आमची ही यात्रा जाणार आहे. आम्हाला लोकांचा खूप उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. आम्ही आता फक्त विकासाचं बोलणार आहोत. आम्ही इतर कोणत्या गोष्टींवर बोलणार नाही.महायुतीच्या नेत्यांनी ही वक्तव्य केली असतील तर आम्ही आमच्या अंतर्गत बैठकीत यासंदर्भात चर्चा करू, असं अजित पवारांनी यावेळी म्हटलं