मी कधीच जातीपातीचं, नात्यागोत्यांच राजकारण केलं नाही – अजित पवार
मुंबईत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या मनात काय आहे ते स्पष्ट केले. आज अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या बैठकी होत्या. दोन्ही नेत्यांनी या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केले. यावेळी अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले.
मुंबई : मी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो. त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे. मी कधीच जातीपातीचं, नात्यागोत्याचं राजकारण केलेलं नाही. समोर आलेल्या कार्यकर्त्याचं, माणसाचं काम करायचं हेच माझे ध्येय आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहे. अजित पवारांनी त्यांचा वेगळा गट स्थापन करून ते भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत गेले. मात्र शरद पवारांनी या निर्णयाला मान्यता न दिल्याने सरळ सरळ दोन गट पडले असून दोन्ही गटांच्या वतीने शक्ती-प्रदर्शन केले जाते.
त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत अजित पवार गटाची वांद्रे येथील एमईटी इन्स्टिट्युट बैठक झाली. त्यावेळी अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मी कधीच जातीपातीचं, नात्यागोत्याचं राजकारण केलेलं नाही. समोर आलेल्या प्रत्येक माणसाचं, कार्यकर्त्याचं काम करतो. मी भल्या पहाटे पासून कामाला सुरूवात करतो, ते रात्री उशीरापर्यंत माझं काम सुरू असतं. महाराष्ट्र पुढे जावा, जनतेचं काम व्हावं म्हणून मी झटत असतो. आपल राज्य, महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य बनाव हे माझं ध्येय आहे, म्हणून मी काम करत असतो.
सत्तेत जाऊन जर लोकांची कामं होत असतील तर का जाऊ नये ? असा सवाल अजित पवार यांनी केला. आम्ही कोणीही हा निर्णय व्यक्तिगत स्वार्थासाठी घेतलेला नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले अजित पवार ?
ही वेळ राष्ट्रवादीवर का आली? मी राजकीय जीवनात काम करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो आहे. घडलो आहे. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. साहेब श्रद्धास्थान आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या. देश पातळीवर आणि राज्य पातळीवर राजकारण सुरू आहे. एखादा पक्ष कशासाठी स्थापन करत असतो. लोकांच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी. संविधानाचा आदर करण्यासाठी. सर्व समाज असेल त्यांच्या विकासासाठी आपण काम करत असतो. सर्व लोकांनी गुण्यागोविंदाने नांदावं. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करायचं असतं त्यासाठी आपण काम करत असतो.
१९६२मध्ये आपल्या वरिष्ठ नेत्यांनी कामाला सुरू केली. ६७ला उमेदवारी मिळाली. ७२ राज्य मंत्री झाले. ७५ला कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर असाच प्रसंग उद्भवला आपल्या वरिष्ठ नेत्याने वसंतदादांचं सरकार बाजूला करून मुख्यमंत्री झाले. ते ३८ वर्षाचे होते. तेव्हापासून राज्यातील जनतेने त्यांना साथ दिली. त्यानंतर पुलोद आलं. त्यात हशू आडवाणी वगैरे होते. ८०ला सरकार गेलं. तेव्हाही इंदिराजी म्हणाल्या, तुम्ही काँग्रेसमध्ये आला तर सरकारमध्ये आला तर सरकार ठेवते. नाही म्हणून सांगितलं. ८०ला निवडणुका झाली. इंदिराजींची लाट आली. त्या पंतप्रधान झाल्या.
इतिहास बघितला तर देशाला करिश्मा असलेलं नेतृत्व लागतं. एकदा जनता पक्षात जयप्रकाश नारायण यांचं ऐकून लोकांनी जनता पक्षाला निवडून आला. ७७ला देशपातळीवर निवडून आलेला जनता पक्ष कुठे आहे. शोधावं लागतोय. कारण करिष्मा असलेला नेता नव्हता.
९९ ला निवडणूक घेतल्या. तेव्हा काँग्रेस एकत्र होती. त्यानंतर सोनिया गांधी परदेशी आहे. असं सांगितलं. परदेशी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही, असं सांगितलं. आम्ही ऐकलं. त्यानंतर राष्ट्रवादीचा जन्म झाला. चार महिन्यात निवडणुका लागल्या. त्यावेळी संपूर्ण मैदान गाजवण्याचं काम भुजबळ यांनी केलं. त्यानंतर आर आर पाटील, सुनील तटकरे, जयंत पाटील, मी आम्ही सर्व तरुण होतो. काही तरी करावं आम्हाला वाटत होतं. सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवायचा होता. पण त्यावेळी आपल्याला फक्त ५८ जागा मिळाल्या. काँग्रेसला राज्यात ताकदीचा नेता नसताना ७८ जागा मिळाल्या. विलासराव मुख्यमंत्री झाले. आम्ही सत्तेत गेलो. कामे केली. मला फक्त सात जिल्ह्याचं खातं मिळालं. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे महाराष्ट्र जाणतो.