Ajit Pawar : साहेबांना सांगूनच मी राजकीय भूमिका घेतली होती – अजित पवारांचा गौप्यस्फोट
लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक होती, मी ती आधीही मान्य केली होती आणि आताही मान्य करतो, असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला.
राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती असो वा मविआ सर्वच पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा होत असून बैठकांचे सत्र सुरू आहे. दरम्यान सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू आहे. काल बारामतीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं, सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे. ‘ शरद पवार यांना सांगूनच मी माझी राजकीय भूमिका घेतली होती’ बारामतीमधील भाषणात त्यांनी हे विधान केलं. ‘ पवार साहेब आधी हो बोलले नंतर नाही म्हणाले’ असं अजित पवार यांनी नमूद केलं. ‘ प्रत्येकाला शेवटी कुठे ना कुठे थांबावं लागतं ‘ असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षरित्या पवार यांना लगावला.
बारामतीमधील डॉक्टर मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी काही विधानं केली. ‘ मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली, ती भूमिका मी साहेबांना सांगूनच घेतली. साहेब पहिल्यांदा हो बोलले, नंतर पुन्हा साहेब म्हणाले मला ते योग्य वाटत नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. कारण त्यांच्या नेतृत्वातच आम्ही सगळी पुढं गेलो, ‘ असं अजित पवार म्हणाले.
‘पण हे सगळं होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही, कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो. त्याच्यामुळे काही अडचण नव्हती . पण आता काय दोन पक्ष झाले आहेत. ‘ असं ते म्हणाले. ‘ प्रत्येकाने कुठे ना कुठे थांबावं लागतं’ असा टोला त्यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांना लगावला
ती माझी चूक
लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक होती, मी ती आधीही मान्य केली होती आणि आताही मान्य करतो, असा पुनरुच्चारही अजित पवार यांनी केला.
अजित पवार कुठून लढणार निवडणूक ?
उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का? कुठून लढवणार? याबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे. बारामतीमधून निवडणूक न लढवण्याचे संकेत त्यांनी मध्यंतरी दिले होते. शिरूरमधून ते निवडणूक लढवणार असल्याची चर्चाही सुरू होती. मात्र आता या चर्चांना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी पूर्णविराम दिला. अजित पवार हे बारामती मतदारसंघातूनच उमेदवार असतील. असे पटेल यांनी सांगितले.