अजित पवार यांचा डाव सुरु, पत्रकार परिषदेत करणार मोठी घोषणा, राष्ट्रवादीच्या नेत्यांची वाढली धडधड
अजित पवार यांनी आगामी निवडणूक घड्याळ चिन्हांवरच लढविणार असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी पक्षावरच आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत ते आपल्या पक्षाचे पदाधिकारी जाहीर करण्याची शक्यता आहे असे सूत्रांनी सांगितले.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काही वेळातच पत्रकार परिषद होणार होणार आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आपल्याकडे सर्व आमदारांचे पाठबळ असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कायदेशीर भूमिका घेणार नाही असे स्पष्ट केले. मात्र, त्याचवेळी त्यांनी पक्षप्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नियुक्तीची घोषणा केली. तर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रात्री उशिरा ज्या नऊ सदस्यांनी शपथ घेतली त्यांना अपात्रतेची नोटीस बजावली. तसेच, विधानसभा अध्यक्षांना तसे पत्र देऊन यावर लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. या साऱ्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार काही वेळातच पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते महत्वाची मोठी घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अजित पवार यांनी मंत्रपदाची शपथ घेण्यापूर्वी आपल्याला संघटनेत पद देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, त्यांच्या या मागणीकडे दुलक्ष करण्यात आले. शरद पवार यांचे विश्वासू जयंत पाटील यांच्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद आहे. मात्र, हेच प्रदेशाध्यक्ष पद खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहेत. अजित पवार आज तशी घोषणा करतील असे या सूत्रांनी सांगितले.
विधिमंडळाचे गटनेते पद प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडेच आहे. तर, अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनिल पाटील यांच्याकडे मुख्य प्रतोद पद होते. मात्र, त्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्याने शरद पवार यांनी त्यांच्या जागी जितेन्द्र आव्हाड यांची नियुक्ती केली. परंतु, अजित पवार यांनी अनिल पाटील यांची पुन्हा प्रतोद म्हणून निवड जाहीर करणार आहेत.
विधिमंडळ गटनेते, प्रतोद, प्रदेशाध्यक्ष यांच्याप्रमाणेच अन्य पदाधिकारी यांच्या नेमणूकही अजित पवार पत्रकार परिषदेतून जाहीर करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही विधिमंडळात दोन प्रतोद, दोन गटनेते पाहायला मिळणार आहेत. तसेच, यावेळी आपल्याला बजवण्यात आलेल्या नोटीसलाही अजित पवार उत्तर देतील अशी माहिती या सूत्रांनी दिली आहे.