धर्मवीर वादावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, स्वराज्यरक्षक नावाचे पुरावे सादर करत आंदोलन कर्त्यांना स्पष्टच सुनावलं
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर नावावरून सुरू झालेल्या वादावर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली असून त्यामध्ये भाजपला थेट आव्हान दिले आहे.
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटाकडून आंदोलन केले जात आहे. विधानसभेत अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हतेच ते स्वराज्यरक्षक होते असे म्हंटले होते. त्यावरून संपूर्ण राज्यभर अजित पवार यांच्याविरोधात वातावरण निर्माण झालेले असतांना अजित पवार माध्यमांसमोर आले नव्हते. मात्र, आज अजित पवार यांनी त्यावर पत्रकार परिषद घेत पुरावे सादर केले आहे. महाविकास आघाडी सरकार असतांना शिरूर मतदार संघात संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळी स्मारक मंजूर केले त्यावरही स्वराज्यरक्षक संभाजी महाराज असे नाव आहे, सरकारी जीआर दाखवत अजित पवार यांनी मी आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हंटले आहे. माझा आग्रही नाही की ते सर्वांनी मान्य करावे, मी जे म्हणतोय ते ज्यांना पटतंय त्यांनी घ्यावे ज्यांना पटत नाही त्यांनी घेऊ नये असेही अजित पवार यांनी म्हंटले आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या आंदोलन कर्त्यांना थेट आवाहन देत हल्लाबोल केला असून मी आजही माझ्या विधानावर ठाम असून मी महाराजांचा कुठलाही अवमान केला नाही असे स्पष्ट केले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निधी दिला होता त्या जीआरवर स्वराज्यरक्षक संभाजी महाराज असा उल्लेख आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असतांना उद्धव ठाकरे यांच्या समोर या सगळ्या बैठका झाल्या आहेत, 11 मार्च 2022 मध्ये स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या नावाने शौर्य पुरस्कार करण्याचे ठरविले आणि त्याची तरतूद अर्थ संकल्पात केली आहे.
279 कोटी 24 लाखाच्या कामाला मान्यता दिली गेली, तुळापुर बाबत जीआर निघाला त्यावर देखील स्वराज्य रक्षक असा उल्लेख आहे असं ही अजित पवार म्हणाले आहे.
प्रत्येक ठिकाणी स्वराज्यरक्षक असाच उल्लेख आहे. भाजपने माझ्या विरोधात आंदोलन केले त्यांनी राजीनाम्याची मागणी केली तो त्यांचा अधिकार नाही.
स्वराज्यमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले त्याचे रक्षण संभाजी महाराज यांनी केले आहे त्यामुळे स्वराज्य रक्षक म्हणालो त्यात मी अपशब्द वापरला नाही
जे माझ्या विरोधात आंदोलनात करतात त्यांनी राज्यपाल आणि भाजप मंत्र्यांच्या बाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे मी नाही असे स्पष्ट अजित पवार यांनी म्हंटले आहे.