संतोष जाधव, धाराशिव: राज्याचे भावी मुख्यमंत्री (Maharashtra CM) म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांचे बॅनर्स पुण्यात झळकले. त्यानंतर जोरदार चर्चा सुरु झाल्या. खुद्द अजित पवार यांनीदेखील मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची इच्छा बोलून दाखवली. राज्यभर या वक्तव्यावरून प्रतिक्रिया उमटल्या. पण अजित पवार ज्या गावचे जावई आहेत, तिथल्या भाबड्या जनतेनंही ही मागणी उचलून धरली आहे. या गावातील लोकांनी जावयाची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी काकांनाच साकडं घातलंय. आता काका म्हणजे राजकारणातले काका नव्हे तर संत गोरोबा काका. या गावकऱ्यांनी संत गोरोबा काकांची विधिवत पूजा करून त्यांना साकडं घातलंय.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे धाराशिव जिल्ह्यातील तेरचे जावई आहेत. अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर आता महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे अजित पवार यांचे बॅनर सासरवाडीतही झळकले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील तेर गावाच्या चौका चौकात” अजित पवार भावी मुख्यमंत्री” असे बॅनर लावले आहेत . विशेष म्हणजे या बॅनरवर अजित पवार यांच्या सह शरद पवार व सुप्रिया सुळे यांचेही फोटो आहेत. एवढेच नाही तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना साकडं घातला आहे.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मूळच्या धाराशिव येथील आहेत. माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण आहेत.
ग्रामस्थांनी संत गोरोबाकाका यांच्या मंदिरात विधिवत पूजा केली .पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा जाहीर बोलून दाखवली, त्यानंतर अजित दादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेला उधाण आलं. उलट सुलट चर्चा ही सुरू झाल्या. गेल्या दोन दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. अजित पवार वारंवार या चर्चा फेटाळून लावत आहेत, मात्र त्यांच्या स्पष्टीकरणाभोवती अजूनही संशय कायम आहे.
गोरोबाकाकांच्या मंदिराचा विकास होण्यासाठी अजितदादा यांना लवकरात लवकर मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर यांनी केली आहे. अजितदादा मुख्यमंत्री झाले तर गावचा विकासदेखील होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली. जावयाने व्यक्त केलेली ती इच्छा पूर्ण करावी, यासाठी संत गोरोबा काकांच्या चरणी प्रार्थना केल्याचं कार्यकर्ते पृथ्वीराज आंधळे यांनी सांगितलं.