Ajit Pawar : अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूर परिस्थितीचा आढावा घेणार
अजित पवार (Ajit Pawar) हे आज गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पूर (Flood) परिस्थितीची पहाणी करून, नुकसानाचा आढावा घेणार आहेत.
जिल्ह्यात पुराचे थैमान
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरूच होता. पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. या पुराचा मोठा फटका जिल्ह्यातील ग्रामीण भागांना बसला आहे. 16268 हेक्टर शेतजमीन पुराच्या पाण्यात गेल्याने पिकं पूर्णपणे नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांवर दुपारपेरणीची वेळ आली आहे. तसेच या पवासांत आतापर्यंत सुमारे 6481 घरे पडल्याची नोंद झाली आहे. घरे पडल्याने लोकांचे संसार उघडल्यावर आले आहेत. या पुराचा फटका हा एकूण 47 गावांना बसला असून, लोक हवालदिल झाले आहेत. जूनपासून ते आतापर्यंत पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनेत बारा जणांचा मृत्यू झाला आहे. आता हे नुकसानग्रस्त शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचा सर्व्हे सुरू आहे. हा सर्व्हे पूर्ण होण्यास 15 दिवस लागण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज अजित पवार हे गडचिरोलीचा दौरा करणार आहेत.
राज्याच्या इतर भागातही पुरामुळे नुकसान
राज्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा राज्यातील विविध विभागांना मोठा फटका बसला आहे. कोकण आणि विदर्भात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने पिके हातची गेली त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो मात्र यंदा मराठवाड्यात देखील मोठ्याप्रमाणात पाऊस झाला असून, शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला आहे.