अजित पवार यांची अमित शाह यांच्याकडे आपल्याच सरकारची तक्रार?; काय घडलं ‘त्या’ बैठकीत?
अजित पवार हे विकास निधी देत नाही म्हणून शिवसेनेचे आमदार महाविकास आघाडीत नाराज होते. याच नाराजीतून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं. या सरकारमध्ये अजितदादा गटाची एन्ट्री झाली. आता महायुतीतही विकास निधीच्या वाटपात मतभेद होत होत असल्याच्या कुरबुरी सुरू झाल्या आहेत. मात्र, यावेळी शिंदे गट ही कुरबूर करत नाहीये. तर...
योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 13 नोव्हेंबर 2023 : महाविकास आघाडीत जे घडलं तेच आता महायुतीत घडताना दिसत आहे. फक्त देणारे आणि घेणारे हात बदलले आहेत. महाविकास आघाडीत असताना अजित पवार हे विकास निधी देत नसल्याचा आरोप शिवसेना करत होती. आता महायुतीत विकास निधी मिळत नसल्याचा आरोप अजितदादा गटाकडून केला जात आहे. विकासनिधी देताना भेदभाव केला जात असल्याचं अजितदादा गटाचं म्हणणं आहे. एवढंच नव्हे तर या बाबतची तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज्य सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं समोर आलं आहे. विकासनिधीच्या वाटपात समानता नाही. शिंदे गटाला ज्यादा निधी मिळत आहे, अशी शिंदे गटाची तक्रार असल्याचं सांगितलं जातं. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी विकासनिधीच्या वाटपावर त्यांच्याशी अजितदादांनी चर्चा केल्याचं सांगितलं जातं. अजितदादांनी एकप्रकारे अमित शाह यांच्याकडे आपल्याच तक्रार केल्याचं सांगितलं जातं.
50 कोटीच्या निधीचं आश्वासन हवेत
अजित पवार हे महायुतीत आले त्यावेळी अजितदादा गटाच्या शिंदे गट आणि भाजपसोबत चर्चा झाल्या होत्या. तेव्हा विकास निधीच्या मुद्यावर चर्चा झाली होती. अजितदादा गटाच्या आमदारांना निधी दिला जाईल असं आश्वासन दिलं होतं. त्याची पूर्तता होताना दिसत नाही. अजित पवार गटाचे आमदारांना प्रत्येकी 50 कोटीचा विकास निधी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. तो निधीच मिळताना दिसत नाहीये. या उलट शिंदे गटाच्या आमदारांना भरभरून निधी मिळत असल्याचं अजितदादा गटाच्या आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे अजितदादांनी हा प्रकार शाह यांच्या कानावर टाकल्याचं सांगितलं जात आहे.
नाराजी नाही
दरम्यान, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी निधी वाटपावरून कोणतीही नाराजी नसल्याचं सांगितलं आहे. निधी वाटपाबाबत कोणतीही नाराजी नाही. आमच्यातरी कानावर अशी नाराजी आली नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
आगे आगे देखो होता है क्या…
ठाकरे गटाचे आमदार सचिन अहीर यांनी निधीच्या मुद्द्यावरून महायुतीला डिवचलं आहे. आमचे सहकारी आमच्यासोबत असताना ज्या पद्धतीने टीका करायचं काम करत होते, आता तेच त्यांच्या पुढ्यात आलं आहे. आगे आगे देखो होता है क्या, असं सूचक विधान करतानाच निवडणुकीनंतर निधी वाटप समान होणार नाही, असा सचिन अहीर यांनी केला.
हा त्यांचा अंतर्गत विषय
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही या प्रकारावर भाष्य केलं आहे. अजितदादा अर्थमंत्री आहेत. त्यांच्या गटावर अन्याय होत असेल अस वाटत नाही. हा सरकार अंतर्गतच विषय आहे. पण कोणत्या आमदाराला किती निधी दिला जातोय याबाबत आजकाल वेगळी प्रथा पडत आहे. प्रत्येकाला मतदारसंघात जास्त निधी हवाय अस दिसून येतं, असं जयंत पाटील म्हणाले.