शिंदेंचं संध्याकाळपर्यंत कळेल, मी तर बुवा काही थांबणार नाही, शपथ घेणारच; अजितदादांच्या कोटीने पिकली खसखस
राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये एकनाथ शिंदे यांची फिरकी घेतली, यावेळी एकच हाशा पिकला.
राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये एकनाथ शिंदे यांची फिरकी घेतली, यावेळी एकच हाशा पिकला. या पत्रकार परिषदेला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांची उपस्थिती होती.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
आम्हाला सरकार चालवण्याचा अनुभव आहे. आम्ही राज्याचा विकास चांगला करू, राज्याला कसा फायदा होईल ते पाहणार आहोत. नैसर्गिक संकटं येत असतात. केंद्र सरकार सोबत होतं. आता आमच्या हातात पाच वर्ष आहेत. चांगलं बहुमत आहे. हा रुसला तो फुगला. याला सांभाळा त्याला सांभाळा वगैरे करण्याची काही गरज पडणार नाही. मुळात कोणी नाराज होणारच नाही. चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे ही जबाबदारी पार पाडतील. जी आश्वासने दिली ती पार पाडण्याचं काम आम्ही करू. राज्याचा देशात नावलौकिक आहे. तो आम्ही देशात नेऊ. नंबर एकचं राज्य करू, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी अजित पवारांना उद्या कोण कोण? शपथ घेणार असा प्रश्न विचारण्यात आला, या प्रश्नाला अजित पवार यांनी अतिशय मिष्किल उत्तर देत एकनाथ शिंदे यांची फिरकली घेतली. ‘शिंदेंचं संध्याकाळपर्यंत कळेल, मी तर बुवा काही थांबणार नाही, शपथ घेणारच’ असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित नेत्यांना हसू आवरता आलं नाही.
उद्या शपथविधी
दरम्यान नव्या सरकाराचा उद्या शपथिविधी होणार आहे. शपथविधीसाठी राज्यापालांकडून उद्या पाच वाजेची वेळ देण्यात आली आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि 22 राज्यातील मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार आहे.