अजित पवारांचं बंड थंडावलं की तूर्तास एक पाऊल मागे? पवार जे बोलतात, त्याच्या उलटंच घडतं!
Ajit Pawar Rebel | अजित पवार यांच्या बंडखोरीच्या बातम्या सकाळपासून सुरु झाल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात तशा घडामोडी दिसू लागल्या. पण दुपारी अखेरीस त्यांनी या सर्व शक्यतांवर पूर्णविराम दिला. याचा अर्थ आत काही घडतंच नव्हतं का?
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) आहेत ते… जे बोलतात त्याच्या नेमकं उलट घडतं… जळगावचे शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील म्हणाले.. तो अनुभव राजकीय वर्तुळातील अनेकांनी घेतलाही असेल. अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करण्याची बातमी सध्या काका-पुतण्यांनी फेटाळून लावली असली तरीही असे प्रयत्न झाले, हे कुणीही नाकारू शकत नाही. गेल्या पाच दिवसांपासून अजित पवारांच्या बंडाबाबतच्या तुफान चर्चा आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते असून असे अचानक नॉट रिचेबल होतात. काल पुण्यातले कार्यक्रम रद्द होतात. आज मुंबईत अजित पवार दिसतात. मुंबईत तडकाफडकी राष्ट्रवादीच्या आमदारांचा ओघ वाढतो. या सगळ्या घडामोडी उगाच घडत नाहीत. खुद्द अजित पवार यांनी दुपारी माध्यमांसमोर येऊन जी प्रतिक्रिया दिली, त्यावरून बंडखोरीची ही प्रक्रिया सुरु झाली होती.. असं म्हणायला वाव आहे.
अजितदादा काय म्हणाले?
सकाळपासून माध्यमांतून सुरु असलेल्या चर्चांवर अजित पवार यांनी दुपारी 2 वाजेनंतर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, ‘ भाजपसोबत जाण्याच्या चर्चा आहेत. त्यातून उगाच वेगळा अर्थ काढू नका. आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी घेण्याची गरज नाही.. शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहणार.. मी कुठेही जाणार नाही, हे काय स्टँप पेपरवर लिहून देऊ का, अशा शब्दात अजित पवार यांनी माध्यमांवर राग काढला. तर आम्ही महाविकास आघाडीतच आहोत, असा निर्णय झालेला आहे, असंही अजित पवार म्हणाले. असा निर्णय़ झालाय म्हणजे.. यापूर्वी काहीतरी घडत होतं, काहीतरी तळ्यात-मळ्यात होतं, असं म्हणण्याला वाव असू शकतो..
संजय राऊतांवर निशाणा..
अजित दादांनी संजय राऊत यांचीही कानउघडणी केली. तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात, त्याविषयी बोला. तुमच्या मुखपत्रातून तुमच्या पक्षाविषयी लिहा, मविआच्या बैठकीत मी हे बोलणार आहे, असं अजित पवार म्हणाले. पण सामनातील रोखठोक प्रकाशित होऊन दोन-तीन दिवस उलटल्यावर ही प्रतिक्रिया आली. ती तेव्हाच का नाही आली, असाही प्रश्न उद्भवतो..
शरद पवार-संजय राऊतांच्या वक्तव्याचं काय?
अजित पवार यांच्या बंडखोरीच्या बातम्या म्हणजे माध्यमांनी उठवलेल्या वावड्या आहेत, असं अजित पवार म्हणत आहेत. पण महाविकास आघाडीतील नेत्यांच्या वक्तव्यांचं काय करायचं हाही प्रश्न आहे. चार दिवसांपूर्वीच शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांची सिल्व्हर ओकवर बैठक झाली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
माझ्या कुटुंबियांवर भाजपकडून दबाव आणला जातोय. कुणाला त्यांच्यासोबत जायचं असेल तर ते जाऊ शकतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस कुणासोबत जाणार नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी या बैठकीत केल्याचा खुलासा संजय राऊत यांनी केला.
सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातूनही संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे, असा थेट आरोप केला. महाविकास आघाडीतील या प्रमुख नेत्यांची वक्तव्य असताना आणि राज्यात त्या धाटणीच्या घडामोडी घडत असतानाही अजित पवार यांनी या अफवा असल्याचं म्हटलं.
शमलं की तूर्तास थांबलं?
एकूणच अजित पवार यांचं बंड तूर्तास शमल्याचं दिसून येतंय. किंबहुना अचानक गायब होणं, आमदारांच्या गाठीभेटी घेणं. गूढ निर्माण करणं आणि दुपारी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देणं.. यावरून सध्या तरी अजित पवार यांनी एक पाऊल मागे घेतल्याचं दिसून येतंय. अजित पवार यांनी सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काका-पुतण्यांनी गेल्या काही दिवसात भाजपच्या बाजूने घेतलेल्या भूमिकांवरून बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही, हेही तितकच खरंय.