अजितदादा…तुम्ही एक दिवस नक्की मुख्यमंत्री बना, देवेंद्र फडणवीस यांचा प्रेमळ सल्ला
विधानसभेत भाजपाप्रणीत महायुतीला २३१ जागांवर मोठा विजय मिळला आहे. तर महाविकास आघाडी केवळ ४६ जागांवरच मर्यादित राहीली आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे.त्यामुळे नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि एनसीपीचे अजित पवार उपमुख्यमंत्री बनले आहेत.

महायुतीचा महाविजय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादांनी ५ डिसेंबर रोजी सहाव्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत अनोखा विक्रम केला आहे. विधानसभेत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांकडे पाहात …भविष्यवाणीच केली. अजितदादा तुम्ही एक दिवस नक्की मुख्यमंत्री बना असे फडणवीस यांनी नागपूर विधीमंडळ सभागृहात सांगताच दादांची कळी खुलली…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना कधी गंभीर तर कधी मिश्कीलशैलीत भाषण केले. ते यावेळी म्हणाले की मी आणि आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे शिफ्टमध्ये २४/७ तास काम करणार आहोत. राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले की अजित पवार सकाळी लवकर उठणाऱ्यांपैकी एक आहेत. त्यामुळे ते सकाळी काम करतील. पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी दुपारी १२ ते मध्यरात्रीपर्यंत ड्यूटी करणार, आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की रात्री उशीरापर्यंत काम करणार कोण आहेत.? ते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहात म्हणाले की शिंदे रात्री उशीरापर्यंत काम करण्यासाठी ओळखले जातात.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अजितदादांकडे पाहात म्हणाले की तुम्हाला विरोधकांकडून ‘पर्मनंट उपमुख्यमंत्री’ म्हणून डिवचले जाते. पण माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. तुम्ही एके दिवशी मुख्यमंत्री बनाल. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकानंतर झालेल्या शपथविधी वेळी अजित पवार यांनी ५ डिसेंबर रोजी सहाव्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे.




मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा अपुरी…
अजितदादांना यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा लपून राहीलेली नाही. त्यांची अनेकदा संधी हुकली आहे. त्यांनी राष्ट्रवादी पक्षात फूट पाडून काकांची साथ सोडण्यामागेही हिच महत्वाकांक्षा असल्याचे म्हटले जाते.तरीही त्यानंतर त्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री व्हावे लागले. आता नव्या सरकारमध्येही त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री पदच नशिबात आले आहे.
कायदेशीर लढाई जिंकली
दरम्यान, आपले काका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाची कायदेशीर लढाई त्यांनी जिंकली. लोकसभेत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामतीत त्यांची चुलत बहिण सुप्रिया सुळे यांनी पराभव केला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर खासदारकी मिळाली आहे. आता विधानसभेत मात्र त्यांनी पुतण्या युगेंद्र पवार यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केलेला आहे. विधानसभेत अजितदादांचे मोठे कमबॅक झाले आहे. त्यांना ४१ जागांवर लॉटरी लागली आहे.