मोठी बातमी: कोरोनामुळे मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय
26 ते 28 मार्च दरम्यान नाशिक येथे साहित्य संमेलन होणार होते. | Akhil Bharatiya Marathi Sahitya sammelan 2021
मुंबई: राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिकमधील नियोजित 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (marathi sahitya sammelan ) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 26 ते 28 मार्च दरम्यान नाशिक येथे साहित्य संमेलन होणार होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता या काळात संमेलन आयोजित केल्यास विपरीत परिणामी होऊ शकतात. त्यामुळे आम्ही साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली. (Akhil Bharatiya Marathi Sahitya sammelan in Nashik postphoned)
या संमेलनासाठीची जवळपास सर्व तयारी झाली होती. अनेक साहित्यिकांना निमंत्रणे पाठवण्यात आली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता आम्ही राज्यातील साहित्य संस्थांशी चर्चा केली. या चर्चेनंतर साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नाशिकमधील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर पुन्हा साहित्य संमेलन घेण्याचा विचार करु, असे साहित्य महामंडाळाकडून सांगण्यात आले.
नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात हे संमेलन होणार होते. जानेवारी महिन्यात नाशिक शहराची कोरोना मुक्तीकडे वाटचाल होत असल्याचं बघायला मिळत होते. मात्र अलीकडच्या काळात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. त्यामुळे नाशिकमध्ये 452 कंटेन्मेंट झोन तयार झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात आले होते.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड झाली होती. जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांची खगोल भौतिक शास्त्रज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध लेखक म्हणून ख्याती आहे. केम्ब्रिज विद्यापीठ टाटा मूलभूत संशोधन संस्था ही त्यांच्यी कार्यसंस्था आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जयंत नारळीकर आणि भारत सासणे यांच्यात स्पर्धा होती. मात्र, शेवटच्या क्षणी जयंत नारळीकर यांनी बाजी मारली होती.
(Akhil Bharatiya Marathi Sahitya sammelan in Nashik postphoned)