अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा
नागपूर: दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आधी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर, आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीच राजीनामा दिला आहे. श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा ई मेलद्वारे दिला. विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर त्यांनी हा राजीनामा पाठवला. यात […]
नागपूर: दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आधी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर, आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीच राजीनामा दिला आहे. श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा ई मेलद्वारे दिला. विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर त्यांनी हा राजीनामा पाठवला. यात त्यांनी सहकार्याबद्दल साहित्य संघाचे आभारही मानले. थेट अध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे येण्याची शक्यता आहे.
यवतमाळमध्ये 11 ते 13 जानेवारीदरम्यान 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मात्र हे साहित्य संमेलन सुरुवातीपासूनच वादात अडकलं आहे. मराठीचा मुद्दा उपस्थित करत यवतमाळमधील स्थानिक मनसैनिकांनी ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून विरोध केला. त्यानंतर साहित्य महामंडळाने नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द केलं. मात्र महामंडळाने कचखाऊ भूमिका घेतल्याने अनेक साहित्यिकांनी या संमेलनावर बहिष्कार घातला. श्रीपाद जोशी यांनीच नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द केल्याचा आरोप आहे. त्यांमुळे त्यांच्यावर साहित्यिकांनी टीका केली होती. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीपाद जोशी यांनी पद सोडणं पसंत केलं.
नयनतारा सहगल यांनी मोठ्या आनंदाने संमेलनाचं निमंत्रण स्वीकारलं होतं. पण मराठी साहित्य संमेलनात इंग्रजी लेखिकेला का बोलवावं, असा आक्षेप मनसे कार्यकर्त्यांनी घेतला होता. इतकेच नाही तर इंग्रजी उद्घाटकाच्या हस्ते उद्घाटन होणार असेल तर संमेलन उधळून लावू असा इशाराही देण्यात आला. त्यानंतर हे निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी सांगितले होते. डॉ. वि. भी. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या संस्थेकडे संमेलनाचे यंदाचे यजमानपद आहे. त्यातच साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी हे निमंत्रण रद्द करण्यास सांगितलं असल्याचा खुलासा डॉ. रमाकांत कोलते यांनी केला होता.
निमंत्रण रद्द करण्यावरुन श्रीपाद जोशी यांच्यावर अनेक साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली. सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याआधी जोशींनी साहित्यिकांशी चर्चा करायला हवी होती, असेही काही साहित्यिक म्हणाले. या पार्श्वभूमीवर बुधवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर त्यांनी हा राजीनामा पाठवला.
कोण आहेत नयनतारा सहगल?
देशात दोन वर्षांपूर्वी पुरस्कार वापसीची मालिकाच सुरु झाली होती. सर्वात अगोदर पुरस्कार वापसी करणाऱ्या लेखिका म्हणून नयनतारा यांची ओळख आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या त्या भाची आहेत. नेहरु-गांधी कुटुंबातील सदस्य म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. पुरस्कार वापसीची कोणतीही तरतूद नसल्याने नयनतारा यांच्यासह 10 साहित्यिकांनी पुरस्कार पुन्हा स्वीकारले होते.
कोण आहेत डॉ. श्रीपाद जोशी?
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी हे महाराष्टारतील एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी केली. महाराष्ट्रातील सुमारे दोनशे सांस्कृतिक संस्थांना एकत्र घेत त्यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीची स्थापना केली. या सांस्कृतिक आघाडीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर संस्कृती, भाषेच्या संवर्धनासाठी उपक्रम राबवले. लेखक संघाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील लेखकांना एकत्र आणण्याचे काम केले. त्यांनी सांस्कृतिक धोरणांचे वास्तव, युग समवाद ही पुस्तकं लिहिली.
संबंधित बातम्या
साहित्य संमेलन : उद्घाटक म्हणून ‘या’ तीन नावांची शिफारस