तर किडनी निकामी होऊ शकते, अकोल्यातील खाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर डॉक्टर काय म्हणाले?
बाळापूर तालुक्यातील खारे पाणी पिण्याने किडनी आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 20 पेक्षा जास्त गावांना याचा फटका बसला आहे. सरकार बदलल्याने 69 गावांच्या पाणीपुरवठा योजनेला विलंब झाला आहे. आमदार नितीन देशमुख यांनी यावर सरकारला धारेवर धरले आहे.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बाळापूर तालुक्यातील 20 ते 25 पेक्षा अधिक गावांमध्ये खारे पाणी प्यायल्याने ग्रामस्थांना किडनीचे आजार झाले आहेत. यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांचा पिण्याच्या गोड पाण्यासाठीचा संघर्ष आजही सुरू आहे, तर अनेकांना पैसे मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीवर बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार नितीन देशमुख काय म्हणाले?
सरकार बदलल्यामुळे 69 खेडी पाणीपुरवठा योजनेला विलंब होत आहे. तत्कालीन शिंदे सरकारने या योजनेला स्थगिती दिली होती, त्यामुळेच किडनीच्या आजारांचा प्रश्न वाढला, असा थेट आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.
“बाळापूर तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये खारे पाणी प्यायल्यामुळे गावकऱ्यांना किडनीचे आजार झाले आहेत. यापूर्वी 69 खेडी पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठवण्यासाठी आम्ही खारपान पट्ट्यातील खारे पाणी घेऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गेलो होतो. मात्र तरीही स्थगिती उठवण्यात आली नाही. अखेर न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने या योजनेवरील स्थगिती उठवली आहे. आता या योजनेला पुन्हा सुरुवात झाली आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत या गावांना गोड पाण्याचा पुरवठा केला जाईल, असे नितीन देशमुख म्हणाले,
किडनी पूर्णपणे निकामी होऊ
या गंभीर समस्येबाबत बोलताना यूरोलॉजिस्ट डॉ. आशिष राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बाळापूर आणि अकोट तालुका हा खारपानपट्टा आहे. या ठिकाणी असलेल्या पाण्यात क्षारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हे खारे पाणी प्यायल्याने किडनीवर अतिरिक्त ताण येतो. तसेच किडनी निकामी होण्याची शक्यता वाढते. अशा पाण्यामुळे किडनी स्टोन (मुतखडा) होण्याची समस्या असते. यावर औषधोपचारानंतर तात्पुरता आराम मिळतो, परंतु याकडे दुर्लक्ष केल्यास किडनी पूर्णपणे निकामी होऊ शकते, असे डॉ. आशिष राऊत यांनी सांगितले.
या भागातील रुग्णांमध्ये ॲग्रीकल्चरल नॅचरोपॅथी नावाचा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. विशेषतः शेतकरी आणि मजूर वर्ग शेतात काम करत असताना कमी प्रमाणात पाणी पितात. हे पाणी क्षारयुक्त असल्यामुळे डिहायड्रेशन आणि किडनीचे आजार वाढतात. एकंदरीत, बाळापूर तालुक्यातील खारे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करत असून, आमदार नितीन देशमुख यांनी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले आहे. आता 69 खेडी पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण होऊन गावकऱ्यांना गोड पाणी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.