‘अटल सेतू’वर वाजतेय धोक्याची घंटा, झाला पिकनिक स्पॉट? लोकांचा वाढला संताप
अटल सेतू हा लोकांच्या वाहतूक सुविधेसाठी आहे. मात्र, या सेतूवरून जाणाऱ्या लोकांनी नियमांकडे दुर्लक्ष करत अटल सेतूला पिकनिक स्पॉट बनवले आहे अशी टीका नेटकरी करत आहेत. लोकांच्या या वृत्तीवर सोशल मीडिया यूजर्स संतापले आहेत.
मुंबई | 15 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी रोजी मुंबईत अटल सेतूचे उद्घाटन केले. त्यानंतर हा पूल लोकांसाठी खुला करण्यात आला. नवी मुंबई येथील अटल पूल हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे. 21.8 किलोमीटर लांबीचा अटल सेतू मुंबई आणि नवी मुंबईला जोडतो. अटल सेतूच्या उद्घाटनानंतर सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र, हे व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केलाय.
व्हायरल व्हिडिओमध्ये अटल सेतूवर उपस्थित असलेले लोक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे. इतकंच नाही तर अटल सेतूवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. लोक जीवाची पर्वा न करता सेल्फी घेताना दिसतं आहेत. त्यामुळे अटल सेतूवर उपस्थित असणाऱ्या लोकांच्या दृष्टिकोनावर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ शेअर करताना एका यूजरने सांगितले की, ‘अटल सेतू पिकनिक स्पॉट बनले आहे’. त्याचवेळी दुसर्या यूजरने हे भयानक दृश्य आहेत. उद्घाटन होऊन फक्त एक दिवस उलटला आहे. पण, अटल सेतूवर कोणताही थांबा नाही आणि लोकांनी ते पर्यटन स्थळ बनवले आहे अशी टीका केली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने येथे एक व्ह्यू गॅलरी तयार केली आहे. जिथे लोक सेल्फी घेऊ शकतात. मात्र, असे असतानाही लोक रस्त्यामध्ये उतरून सेल्फी घेत आहेत. तेथे कचराही टाकला जात आहे यावर लोकांनी संताप व्यक्त केलाय.
एमएमआरडीएने अपघाताची भीती व्यक्त केली
एमएमआरडीएनेही या मुद्द्यावर ट्विट केले आहे. सर्वसामान्यांच्या सेवेसाठी अटल सेतू सुरू करण्यात आल्याचे यात म्हटले आहे. या पुलावरून लोक ताशी १०० किलोमीटर वेगाने चारचाकी वाहने चालवू शकतात. मात्र, पुलावर वाहन थांबवून सेल्फी घेऊ नका, त्यामुळे अपघात होऊ शकतो. लोकांनी आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे असे एमएमआरडीएने म्हटले आहे.
अटल सेतू देशातील सर्वात लांब सागरी सेतू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी 21.8 किमी लांबीच्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू सी लिंकचे उद्घाटन केले. भारतातील सर्वात लांब पूल असण्यासोबतच अटल सेतू हा देशातील सर्वात लांब सागरी सेतू देखील आहे. एकूण 17,480 कोटी रुपये खर्चून अटल सेतू बांधण्यात आला आहे. हा सहा पदरी पूल 21.8 किमी लांबीचा आहे. त्यापैकी 16.5 किमी लांबीचा समुद्रमार्ग आहे.