राज्यात 486 ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका, प्रशासन अलर्ट; मुख्यमंत्र्यांच्या सूचना काय?
राज्यातील सर्व अनधिकृत होर्डीग्ज काढून टाकावेत. ज्यांनी अनधिकृत होर्डिंग्ज ठेवले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. अधिकृत होडींग्ज आहेत त्यांचेही स्ट्रक्चरल ऑडीट करा. मुंबईत एमएमआरडीए, रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या होर्डिंग्जसाठी मुंबई महापालिकेचा परवाना आवश्यक आहे. महापालिकेने नॉर्म्स नुसार होर्डिंग्ज उभारण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
राज्यात पुढच्या महिन्यात पावसाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसात अनेक घरांची पडझड झाली. शेतीचं मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्सूनचा आढावा घेतला. प्रशासनाशी चर्चा केली आहे. काही सूचनाही दिल्या आहेत. राज्यात एकूण 486 ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असल्याचंही या बैठकीत आढळून आलं. त्यामुळे या ठिकाणी विशेष काळजी घ्या. तिथल्या नागरिकांची दुसरीकडे कायमस्वरुपी व्यवस्था करा, असे आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. या बैठकीला सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जलजन्य आजार, साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. औषधे, गोळ्यांचा साठा पुरेसा आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
एसडीआरएफच्या टीम वाढवा
एसडीआरएफच्या आठ टीम आहेत. त्यांची संख्या वाढवण्यात यावी. टीडीआरएफच्या धर्तीवर महापालिकांनी पथके सुरु करावीत. विभागनिहाय एसडीआरएफ टीम तयार करा. बचावकामासाठी स्थानिक तरुण पुढाकार घेतात. त्यांना बचाव कार्याचं प्रशिक्षण द्या. आवश्यक साहित्य द्या, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुंबईत 10 जूनला पाऊस
हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात 96 ते 106 टक्के पाऊस होणार आहे. 10 ते 11 जून दरम्यान मुंबईत पावसाची सुरुवात होणार आहे. 15 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरवात होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळीमध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी मान्सूनच्या तयारीची माहिती दिली.
उल्हास नदीवरील बदलापूर बॅरेज येथील ब्रिटीशकालीन पीअर्स हटविण्यासाठी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. यंदाच्या पावसाळ्यात आर्मी, नेव्ही, इंडियन एअर फोर्स, कोस्टगार्ड आदी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
समन्वयाने काम करा
31 मेपर्यंत प्रत्येक धरणांच्या ठिकाणी वायरलेस यंत्रणा कार्यान्वित होईल. वादळी वाऱ्यात वीजपुरवठा सुरळीत रहावा यासाठी उर्जा विभागाने दक्षता घ्यावी. संपर्क सुटलेल्या ठिकाणी, औषध, पाणी आणि धान्य पुरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. धोक्याची सूचना देणारी यंत्रणा अलर्ट ठेवावी, नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. मुंबईतील रस्त्यांवरील मॅनहोलला झाकण आणि गर्डर बसविण्यात यावे. सर्व यंत्रणांनी समन्वयातून काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.