चंदन पुजाधिकारी, नाशिक : राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी दोन गट निर्माण झाले. अजित पवार आणि शरद पवार यांचा गट निर्माण झाल्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सरळ उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या फुटीनंतर शरद पवार स्वत: मैदानात उतरले. ते राज्याचा दौरसुद्धा करणार आहेत. दोन्ही गट जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी अन् पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यासंदर्भात जिल्हास्तरावरसुद्धा बैठका सुरु झाल्या आहेत. आता नाशिक जिल्ह्यातून मोठी बातमी आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आमदार आहेत. हे सर्व आमदार अजित पवार यांच्या सोबत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ, दिलीप बनकर, नितीन पवार, सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ हे आमदार आहेत. एकंदरीत सध्या तरी नाशिक जिल्ह्यात अजित पवार यांचे पारडे जड आहे.
नाशिकमधील आमदार नरहरी झिरवाळ विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. ते सध्या नॉट रिटेबल झाले आहेत. त्यांना माध्यमांसमोर न येण्याचे सूचना अजित पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. तांत्रिक कारणामुळे नरहरी झिरवाळ यांना माध्यमांसमोर न येण्याचे सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ते सध्या नॉट रिचेबल झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कोणासोबत आहे, याचा निर्णय मंगळवारी दुपारी होणार आहे. त्यासाठी पुणे शहरात बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत यासंदर्भातील निर्णय होणार आहे.