युती हवीय, पण आम्ही लाचार नाही, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला थेट इशारा
जालना : देशाच्या कल्याणासाठी आणि देश चोरांच्या हातात जाऊ नये यासाठी आम्हाला युती हवी आहे. पण भाजप लाचार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय. ज्यांना हिंदूत्त्व हवंय ते येतील, नाही आले तर स्वबळावर लढण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिलेत. ही अटल बिहारी वाजपेयी आणि मोदींची भाजपा आहे, ती कुणासमोरही लाचार नाही, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला […]
जालना : देशाच्या कल्याणासाठी आणि देश चोरांच्या हातात जाऊ नये यासाठी आम्हाला युती हवी आहे. पण भाजप लाचार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय. ज्यांना हिंदूत्त्व हवंय ते येतील, नाही आले तर स्वबळावर लढण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिलेत. ही अटल बिहारी वाजपेयी आणि मोदींची भाजपा आहे, ती कुणासमोरही लाचार नाही, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला ठणकावलंय.
युतीची काळजी करु नका. दोन जागांवरुन 285 जागांवर आलेला हा भाजप पक्ष आहे. आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलंय. अटल बिहारी वाजपेयी आणि मोदींची भाजपा लाचार होणार नाही. ज्यांना हिंदूत्त्व हवंय ते येतील. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ताकद दाखवू, असं आव्हानही फडणवीसांनी दिलंय.
जालन्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची सभा झाली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपातील सर्व मंत्री, नेते, आमदार आणि खासदार या सभेला उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या सभेने बैठकीची सांगता झाली. या भाषणात मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जोरदार समाचार घेतला.
“ही निवडणूक फक्त भाजप किंवा मोदींसाठी नाही”
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एकत्र येत असलेल्या पक्षांनी त्यांचा नेता कोण आहे ते जाहीर करावं, याचं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं. जे कधी एकमेकांचं तोंड पाहत नव्हते, ज्यांच्याकडे कसलंही धोरण नाही, ते मोदींच्या भीतीपोटी एकत्र येत आहेत. पण भाजप या देशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आगामी निवडणूक ही फक्त भाजपसाठी किंवा मोदींसाठी नाही. ही निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी आहे. भारत ही जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जगाचे डोळे भारताकडे आहेत. अशा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात असताना ही निवडणूक देशासाठी आणि जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं म्हणत पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा असं आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या यात्रांची खिल्ली
काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून राज्यात वेगवेगळ्या यात्रा काढल्या जात आहेत. पण जनता कोणाच्या पाठीशी आहे ते नगरपालिका निवडणुकांमध्ये दिसून आलंय, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. यांनी एवढ्या यात्रा काढल्यात की त्याचं नावही मला लक्षात राहत नाही, असं ते म्हणाले.
ज्या गडचिरोलीतून काँग्रेसने यात्रेची सुरुवात केली, त्या गडचिरोलीतील नगरपरिषदेमध्ये भाजपने सत्ता मिळवली. राष्ट्रवादीने ज्या रायगड जिल्ह्यातून यात्रेची सुरुवात केली, त्या कर्जतमध्ये भाजप-शिवसेना युतीने सत्ता मिळवली. यांची आघाडी होत असली तरी लोकांनी भाजप-शिवसेना-आरपीआय युतीलाच मत दिलंय, असंही मुख्यमंत्री म्हणाले.