केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकातही यांचंच सरकार, तरीही पाणी सोडलं नाही : संभाजी भिडे
शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी या महापुरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. या कामाचं लष्कराकडूनही कौतुक झालं. यानंतर टीव्ही 9 मराठीने संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
सांगली : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून लवकर पाणी सोडलं नाही आणि त्याचा फटका सांगलीला बसला. केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकातही यांचंच (भाजप) सरकार आहे. पण तरीही लवकर पाणी सोडलं नाही हे खरंच दुर्दैवी आहे. पाणी लवकर सोडलं असतं तर ही हानी टाळता आली असती, अशा शब्दात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी या महापुरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. या कामाचं लष्कराकडूनही कौतुक झालं. यानंतर टीव्ही 9 मराठीने संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
“या महापुरात जे शक्य होतं, तेवढं शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केलं. हे काम सर्वांनी मिळून केलंय. आता सर्वांनी मिळून गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही विडा उचलणार आहोत. गेल्या 70 वर्षातील राज्यकर्त्यांनी चांगल्या सवयी लावल्या नाहीत. प्रशासन दोषी असलं तरी पूर्णपणे त्यांना दोषी धरता येणार नाही. राज्यकर्ते नीट वागले नाही. अजूनही राज्यकर्ते निवडून देताना विचार करण्याची गरज आहे,” असंही संभाजी भिडे म्हणाले.
“या महापुरामुळे लोकांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. एकमेकांना मदत करुन या परिस्थितीवर मात करण्याची गरज आहे. कर्नाटक सरकारने अलमट्टीतून विसर्ग लवकर केला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती. देशात, कर्नाटकात आणि महाराष्ट्रातही यांचंच सरकार असून लवकर पाणी सोडलं नाही हे दुर्दैवी आहे. लवकर पाणी सोडायला पाहिजे होतं,” असंही संभाजी भिडे म्हणाले.
“स्व. राजाराम बापू पाटील यांनी जी संल्पना त्या काळी सरकारसमोर ठेवली होती, सरकने ती संकल्पना त्यावेळी राबवली असती तर आताचं संकट आलं नसतं. अजूनही ती संकल्पना राबवता येईल. पाणी अडवून कराड येथील खुगाव येथे धरण करावं, ते पाणी सांगोला किंवा इतर दुष्काळी भागाला द्यावं, शेतकरीही सुखी होईल आणि संकटही टाळता येईल,” असंही संभाजी भिडे म्हणाले.