मोठी बातमी ! राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडिट’ करा, जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांचे निर्देश
मोठी बातमी ! राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडीट’ करा, जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांचे निर्देश (oxygen and fire audit)
मुंबई : नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज (23 एप्रिल) जिल्हा यंत्रणेला दिले. तसेच ऑक्सिजन टँकर्सना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून पोलीस संरक्षणात त्याची वाहतूक करावी आणि परस्पर टॅंकर वळवू नयेत, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या आहेत. (amid Nashik Oxygen leak and Virar Covid Hospital fire Maharashtra Chief Secretary instructs all district administration to conduct fire and oxygen audit of all hospitals)
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा तसेच ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरची उपलब्धता, रुग्ण व्यवस्थापनासंबंधीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी बैठक बोलावली होती. यावळे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सीताराम कुंटे यांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी वरील निर्देश दिले.
टास्क फोर्सच्या सूचनेनुसार रुग्णांना ऑक्सिजन द्यावा
राज्यातील सर्व रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट करतानाच आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याचे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले. यासोबतच सर्व रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश मुख्य सचिवकुंटे यांनी दिले. तसेच रुग्णाला शास्त्रशुद्ध पद्धतीने ऑक्सिजन दिला जात आहे का ?, तो वाया जावू नये यासाठी टास्क फोर्सच्या सूचनांचे पालन होत आहे का ? या सर्व याबाबींची तपासणी करावी असेसुद्धा कुंटे यांनी यावेळी सांगितले. रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या नलिका, साठवणूक यंत्रणा याचीही पाहणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घ्या
सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घेण्यात यावे जेणेकरून सिलिंडर आणि लिक्विड ऑक्सिजनवरील असलेलं अवलंबत्व कमी करता येईल, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट उभारावेत, असेही ते म्हणाले.
ऑक्सिजन टॅंकरला रुग्णवाहिकेचा दर्जा
राज्यात ऑक्सिजन टॅंकरची वाहतूक कुणीही रोखू नये त्यासाठी त्याला रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. पोलीस संरक्षणात या टॅंकरची वाहतूक करण्यात यावी. तसेच कुठल्याही प्रकारे ऑक्सिजन टॅंकर वळविण्यात येऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाला सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात नियोजनबद्धरित्या ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा असे सांगतानाच आज रात्री (शुक्रवारी) विशाखापट्टणम् येथून रेल्वेद्वारे ऑक्सिजन टॅंकर येणार असून त्यातील चार नागपूर आणि नाशिक येथे पाठविण्यात येतील, असे मुख्य सचिवांनी सांगितले.
यावेळी मुख्य सचिवांनी राज्यातील उपलब्ध ऑक्सिजनचा आढावा घेतला. राज्यात अन्य ठिकाणांहून जो ऑक्सिजन आणला जात आहे; त्याच्या साठवणुकीची सुविधा तयार करावी, असे निर्देशही कुंटे यांनी यावेळी दिले. रेमडेसिव्हीरच्या उपलब्धतेबाबत प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
इतर बातम्या :
(amid Nashik Oxygen leak and Virar Covid Hospital fire Maharashtra Chief Secretary instructs all district administration to conduct fire and oxygen audit of all hospitals)