अमित ठाकरे विधानपरिषदेतून आमदार होणार?; मनसे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया काय?
आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजप युती होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप मनसेला काही जागा सोडू शकतं, असे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यात वर्तवली जात आहे. भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. आता याबद्दल मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण 12 जागांपैकी 5 जागा रिक्त आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता. यानंतर आता भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवलं जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजप युती होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप मनसेला काही जागा सोडू शकतं, असे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी प्रकाश महाजन यांना अमित ठाकरेंना विधानपरिषदेवर पाठवण्यात येण्याच्या चर्चांबद्दल प्रतिक्रिया विचारली. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले.
“राज ठाकरेंना जे काही योग्य वाटेल ते करतील”
“अमित ठाकरेंना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार करावं की नाही, याचा सर्वस्वी निर्णय राज ठाकरे घेतील. राज ठाकरे जो निर्णय घेतील तो पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य असेल. कारण हा इतका उच्च पातळीवरचा विषय आहे. त्यामुळे हा निर्णय सामान्य कार्यकर्त्याशी चर्चा करुन घेतला जाणार नाही. राज ठाकरेंना जे काही योग्य वाटेल ते करतील”, असे प्रकाश महाजन म्हणाले.
“भाजपचा हौसला सध्या बुलंद”
“मला भाजपकडून असा काही प्रस्ताव आलाय का, याबद्दल माहिती नाही. कारण दिल्लीच्या विजयामुळे भाजपचा हौसला सध्या बुलंद झाला आहे. त्यामुळे त्यांना आता नवीन मित्र जोडायचे की आहे ते मित्र तोडायचे, याबद्दल सध्या गोंधळाची स्थिती आहे”, असेही प्रकाश महाजन यांनी म्हटले.
“नुसते भेटतात, पण पुढे काही होत नाही”
राज ठाकरेंच्या घरी शत्रू गेला तरी ते स्वागत करतात. भाजपने कसं वागावं हा त्यांचा प्रश्न आहे. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की महायुती उमेदवार असून आमचे बाळा नांदगावकर पडले. बाळा नांदगावकरसारखा उमेदवार पडतो हे आश्चर्याची गोष्ट आहे. हे नुसते भेटतात, पण पुढे काही होत नाही, त्यामुळे कार्यकर्ते नाराज होतात. तीन पराभव माझ्या जिवाला खूप लागले. बाळा नांदगावकर यांना महायुतीने पाठिंबा दिला, हा खूप जिव्हारी लागला. दुसरा पराभव मला अमित ठाकरे यांचा जिव्हारी लागला, असेही प्रकाश महाजन म्हणाले.