अकोला | 5 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका पदाधिकाऱ्याच्या नियुक्तीवर निषेध नोंदवलाय. तसेच पक्षाकडून संबंधित पदाधिकाऱ्याची आपल्या आक्षेपानंतरही नियुक्ती केली तर आपण थेट आमदारकीचा राजीनामा देऊ, असा इशाराच मिटकरी यांनी दिला. त्यामुळे चांगला गोंधळ उडाला. हा सारा वाद खुद्द ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे-पाटलांसमोरच घडला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. या वादाचं कारण होतं शिवा मोहोळ यांची निवड. शिवा मोहोळ हे अकोल्यातले राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत.
राष्ट्रवादी फुटीआधीच मोहोळ यांनी अमोल मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप करुन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. तेव्हापासून मिटकरी-मोहोळांमध्ये वाद आहे. त्यामुळे अशा व्यक्तीच्या निवडीला आपला विरोध आहे. अशाप्रकारची नियुक्ती केल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन, असा इशाराच मिटकरींनी स्टेजवर दिला. अकोल्यात अजित पवार गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात हा गोंधळ झाला.
“खोटं सांगू नका. दादांनी पक्षप्रवेश दिलेला नाही. माझा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. संघटनेची शिस्त सगळ्यांनी पाळायची. ही पद्धत नाहीय सुरजभैय्या.. थांबा… थांबा… बोलतोय ना मी…”, असं म्हणत अमोल मिटकरी आक्रमक झाले. यावेळी आमचा अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाल्याचा दावा मोहोळ यांनी केला. त्यावर मिटकरींनी खोटं बोलू नका, असं म्हटलंय. मात्र महिन्याभरापूर्वीच मुंबईत मोहोळ यांचा अजित पवार गटात प्रवेश झालाय. दरम्यान अकोल्यात मोहोळ यांना उपजिल्हाप्रमुख पदाच्या निवडीचे अधिकृत पत्र दिले जाणार होते. मात्र मिटकरींच्या विरोधानंतर सुरज चव्हाणांनी हस्तक्षेप केला, आणि हा फैसला आता मुंबईत घेऊ म्हणून वाद मिटवला.
जर आपल्यावर आरोप करणारा आपल्यासोबत नको, असा मिटकरींचा युक्तीवाद असेल तर ज्या भाजपनं अजित पवारांसह मुश्रीफ-भुजबळांवर आरोप केले. खुद्द ज्या अमोल मिटकरींनी विरोधात असताना अब्दुल सत्तारांवर आरोप केले, तेच मिटकरी सत्तेत त्यांच्यासोबत कसे? हा देखील प्रश्न आहे