शिंदे साहेब, सदगुरू संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही; कोण म्हणालं असं?
नवी मुंबईतील महाराष्ट्र भूषण पुरस्कारा दरम्यान उष्माघाताने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीने तर या प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
नागपूर : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान 13 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं आहे. खासकरून कार्यक्रमाचं नियोजन आणि कार्यक्रमाची वेळ या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. या दुर्देवी घटनेवरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनीही राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतलं आहे. शिंदे साहेब, सदगुरू संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असं सांगतानाच या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीच अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. मिटकरी मीडियाशी संवाद साधत होती.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी एवढा खर्च करण्यात आला. पाण्यासारखा पैसा ओतला. मग लोकांसाठी चांगली व्यवस्था का करता आली नाही? केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी चांगली व्हीआयपी व्यवस्था होती. मात्र भक्त संप्रदायाचे सदस्य लाखोंच्या संख्येने येतील हे प्रशासनाला कळलं नाही का? मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख दिले जात आहेत. मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं आहे. या घटनेचं राजकारण करू नये म्हणून सांगितलं गेलं. राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही. पण शिंदे साहेब, एवढी माणसं मरत असतील तर सदगुरू संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.
राज्यपालांना पत्र लिहिणार
या घटनेची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण राज्य सरकारच या घटनेला सर्वस्वी जबाबदार आहे. सरकारच या कार्यक्रमाचे आयोजक आहे. याबाबत मी राज्यपालांना पत्र लिहिणार आहे, असं मिटकरी यांनी सांगितलं.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
दरम्यान, आप्पा धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात अंदाजे 12 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडल्याची बातमी आहे. बरेचजण अत्यवस्थ आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, प्रधान सचिव यांच्यासह आप्पा धर्माधिकारी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्यांच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केली आहे.