24 तासात ‘त्या’ महंतांना अटक करा, अन्यथा रस्त्यावर उतरू राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा इशारा
नाशिकच्या काळाराम मंदिरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या प्रसंगावरून सध्या राजकारण पेटलं आहे. कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सपत्नीक काळाराम मंदिरात दर्शन घेतलं. त्यावेळी मंदिरातील महंतांनी त्यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून मज्जाव केल्याचा आरोप करण्यात आलाय.
गणेश सोनोने, अकोला : नाशिक येथील काळाराम मंदिरात (Kalaram Temple) घडलेल्या प्रकारावरून आता महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकारावरून तीव्र निषेध व्यक्त केलाय. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी तर छत्रपतींच्या वारसदारांचा अपमान करणाऱ्या महंतांना 24 तासांच्या आत अटक करा, असा इशारा दिला आहे. नाशिकच्या त्या महंतांना अटक केली नाही तर बहुजन समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिलाय. तर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हेदेखील आक्रमक झाले आहेत. आव्हाड आज नाशिक येथील काळाराम मंदिरात जाणार असून तिथे आज काय घडतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
काय आहे नेमकं प्रकरण?
नाशिकच्या काळाराम मंदिरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या प्रसंगावरून सध्या राजकारण पेटलं आहे. कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सपत्नीक काळाराम मंदिरात दर्शन घेतलं. त्यावेळी मंदिरातील महंतांनी त्यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून मज्जाव केल्याचा आरोप करण्यात आलाय. संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी यासंदर्भातील पोस्ट लिहिल्यानंतर यावरून तीव्र सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावरून महंत सुधीरदास यांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन हे आरोप फेटाळून लावलेत. संयोगिताराजे यांनी आक्षेप घेतला होता, पण त्यानंतर तिथे कोणताही वाद निर्माण झाला नव्हता, असं स्पष्टीकरण महंत सुधीरदास यांनी दिलंय.
‘महंत खोटे बोलतायत’
दरम्यान, महंत सुधीरदास यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरूनच अमोल मिटकरी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महंतांइतकी मग्रुरी आणि इतकी मस्ती जर या मानतांमध्ये असेल. आता आम्ही शांत बसणार नाही…. महाराष्ट्रातल्या बहुजनांनी जाग व्हावं, अशा भोंदू बाबांना जाब विचारा, नव्हे तर सरकारने यांना तत्काळ अटक करावी, याकरिता बहुजन समाजाने आता जनजागरण करावे या मताचा मी आहे, ज्या महंतांनी संयोगिता राजेंचा अपमान केला असेल… त्यांना 24 तासांच्या आत अटक करा, नाहीतर महाराष्ट्र मध्ये बहुजन समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा या वेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड आज काळाराम मंदिरात
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. आव्हाड आज नाशिक येथील काळाराम मंदिरात जाणार आहेत. छत्रपतींच्या वारसदारांना आजही अशी वागणूक दिली जाते तर राज्यातील आमच्यासारख्या इतर बहुजनांबद्दल काय घडत असेल? राणी संयोगितांशी हे असे वागू शकतात, तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या बायका काळाराम मंदिरात जातील, तेव्हा त्यांना काय वागणूक दिली जाईल, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.