बालकांच्या अतिदक्षता कक्षात आग, ऑक्सिजन मेंटेन करणारी मशीन पेटली
अचानक लागलेल्या आगीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. कर्मचाऱ्यांनी तातडीने लहान बालकांना, दुसऱ्या वार्डात शिफ्ट केल्याने मोठा अनर्थ टळला. यात केवळ दोन बालकांना किरकोळ इजा झाली.
सुरेंद्रकुमार आकोडे, Tv9 मराठी प्रतिनिधी, अमरावती : अमरावती जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता कक्षाला अचानक आग लागली. ही घटना आज सकाळी 9 वाजता घडली. ही आग बालकांच्या अतिदक्षता विभागातील इनक्यूबेटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागल्याची माहिती समोर आली. हा बालकांचा कक्ष 27 क्षमतेचा असताना या कक्षात 40 बालके होती. यामध्ये दोन बालकांना किरकोळ इजा झाली. त्यामुळे दुसऱ्या वॉर्डामध्ये शिफ्ट करण्यात आले. डॉक्टर, नर्स,कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे कोणताही जीवितहानी झाली नाही.
जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता कक्षाला आग लागल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या आगीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. कर्मचाऱ्यांनी तातडीने लहान बालकांना, दुसऱ्या वार्डात शिफ्ट केल्याने मोठा अनर्थ टळला. यात केवळ दोन बालकांना किरकोळ इजा झाली. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. नागरिकांच्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने सध्या परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
नाना पटोलेंकडून रुग्णालयाची पाहणी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अमरावती दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी जिल्हास्तरीय रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री आहे. प्रशासन आणि शासन या दोन्ही गोष्टींचा समन्वयक नाही. शासनाची भूमिका स्पष्ट होत नाही. लोकशाहीची थट्टा शिंदे आणि भाजप सरकारकडून होते. पालकमंत्री स्पायडरमॅन सारखे काम करणार का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
शासन आणि प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री सातत्याने यासंदर्भात मागोवा घेत आहेत. लवकरच जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालय नवीन इमारतीत सुरू होणार असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. या आगी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात हॉस्पिटलची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करू अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली.