अजित पवार यांनी उपस्थित केले महत्त्वाचे प्रश्न, शिंदे-फडणवीस सरकारला दिला हा सल्ला
हे असं काही करण्यापेक्षा जनतेच्या समोर असणारे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचे काम शिंदे -फडणवीस सरकारने करावेत, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.
स्वप्निल उमप, प्रतिनिधी, अमरावती : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अमरावती येथे आले होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, सर्व्हेला काही अर्थ नसतो. यामुळे लक्ष विचलित होते. जी जाहिरात दिली होती ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, आनंद दिघे यांचा फोटो नव्हता. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला. काही जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो होता. त्याबाबत त्यांच्या कामाला पसंती देण्याचा प्रयत्न केला. भाजपचे अनेक लोक दुखावले गेले होते. त्यांच्यात खदखद होती. दुसऱ्या दिवशी जाहिरात दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये मंत्र्यांचे फोटो टाकले जातात. हा पोरखेळ सुरू आहे. हे असं काही करण्यापेक्षा जनतेच्या समोर असणारे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचे काम शिंदे -फडणवीस सरकारने करावेत, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.
तर समाजाला दिलासा मिळेल
चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. यांचा असा प्लॅन होता. तसा प्लॅन होता, याला काही अर्थ नाही. पहिल्यांदा राज्यात प्रचंड बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या हे या प्रश्नावर त्यांनी बोलले पाहिजे. हे असं होणार होतं. तसं होणार होतं हे सांगून महागाई कमी होणार आहे का? खतांच्या किमती वाढल्या आहे. पाऊस येत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आहे. यावर तुम्ही बोललो पाहिजे. केंद्रात तुम्ही आहात राज्यात तुम्ही आहे. या प्रश्नांची उत्तर दिली तर काही प्रमाणात समाजाला दिलासा मिळेल, असंही अजित पवार म्हणाले.
यावर बोलायला पाहिजे
हे सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हा 75 हजार उमेदवारांची सरकारी नोकर भरती करू, असं सांगितलं होतं. मात्र आता त्यांना बंड करून एक वर्ष पूर्ण झाला आहे. त्यांनी वर्षभरामध्ये किती लोकांना नोकऱ्या दिल्या? किती महागाई कमी केली? किती शेतकऱ्यांना न्याय देऊन आधारभूत किंमत मिळवून दिली? शेतकऱ्यांच्या किती समस्या सोडवल्या? यावर बोलायला पाहिजे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील
महाविकास आघाडी एकजूट राहावी, अशा पद्धतीने तिन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. शेवटी महत्त्वाचे निर्णय होत असताना मी जेव्हा विरोधी पक्ष नेता झालो तेव्हा आत्ताच सरकार सत्तेवर आल्यानंतर आमची संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला विरोधी पक्षनेता पद मिळालं. वरच्या सभागृहामध्ये शिवसेनेला विरोधी पक्षनेता पद मिळालं. यामध्ये आता संख्या किती आहे यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असंही अजित पवार यांनी म्हंटलं.