‘उद्या गल्लीबोळातल्यांविषयी विचाराल’, म्हणणाऱ्या पवारांना बच्चू कडू यांचा धक्का, वाशिममध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार!
बच्चू कडू यांनी केलेल्या टिप्पणीबाबत पवारांना पत्रकारांनी प्रश्न केला होता. त्यावर बोलताना कोण बच्चू कडू? उद्या तुम्ही गल्लीबोळातल्यांविषयी विचाराल, असं पवार म्हणाले होते. पवारांनी काल टीका केली त्यानंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.
स्वप्निल उमप, अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेमध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला होता. बच्चू कडू यांनी केलेल्या टिप्पणीबाबत पवारांना पत्रकारांनी प्रश्न केला होता. त्यावर बोलताना कोण बच्चू कडू? उद्या तुम्ही गल्लीबोळातल्यांविषयी विचाराल, असं पवार म्हणाले होते. पवारांनी काल टीका केली त्यानंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.
बच्चू कडू यांचा धक्का
वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांच्या कार्यशैलीवर मानोऱ्याचे नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे नाराज होते. नगराध्यक्ष हेमन्द्र ठाकरे आणि 10 राष्ट्रवादीचे आणि भाजपच्या एका नगरसेवकाने थेट बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश केला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा या ठिकाणी पक्षप्रवेश करण्यात आला.
काय म्हणाले होते शरद पवार?
शरद पवार यांना बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकरांनी सांगितल्यावर त्यांनी, मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. केंद्रात अनेक वर्षे मोठी जबाबदारी स्कीकारली आहे. तुम्ही कुणीही काही आरोप केले की विचाराल. यावर पत्रकाराने ते चारवेळा आमदार आहेत आणि अपक्ष निवडून आल्याचं सांगितलं. त्यानंतर ते चारवेळा आमदार होते तर मी चारवेळी मुख्यमंत्री होतो, असं सांगितलं.
बच्चू कडू काय म्हणालेले?
राष्ट्रवादी मोठा गेम करत असून पवार काका-पुतणे महाराष्ट्राला वेड्यात काढत आहेत. पवार साहेब जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाहीत ते करतात. शिवसेना फुटल्यानंतर जे घडलं ते इथे काही दिसत नाही. सगळ्यांचा संगम करून ते स्वत: चा सागर तयार करतील, असं बच्चू कडू म्हणाले होते.
दरम्यान, कोण बच्चू कडू असं पवार म्हणाले अन् इकडे वाशिममध्ये पक्षाला खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीच्या 10 नगरसेवकांसह भाजपच्या एका नगरसेवकाने प्रहार पक्षामध्ये प्रवेश केलाय. पवारांच्या कालच्या वक्तव्यानंतर नगरसेवकांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.