बच्चू कडू यांचे ‘भैय्या’ ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात, निवडणूक किती प्रतिष्ठेची? पाहा काय म्हणाले…
बच्चू कडू यांचे भाऊ भैय्या कडू सरपंचपदासाठी निवडणूकीच्या रिंगणात
अमरावती : आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. अमरावती जिल्ह्यातील 252 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडतेय. अमरावती जिल्ह्यातील बेलोरा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रहारचे नेते, आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे बंधू निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बच्चू कडू यांचे भाऊ भैय्या कडू (Bhaiya Kadu) सरपंचपदासाठी निवडणूकीच्या रिंगणात आहेत. बच्चू कडू यांचे बंधू निवडणुकीच्या रिंगणात असल्याने बेलोरा गावात यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी बच्चू कडू अमरावतीतील चांदुर बाजार तालुक्यातील बेलोरा या त्यांच्या गावात उपस्थित होते. तेव्हा बोलताना त्यांनी या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिलीय.
बेलोरा गावची ही ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची वगैरे नाही. तर मागच्या अनेक वर्षांपासून आम्ही लोकांच्या हिताची कामं केलीत. त्यामुळे लोक त्या नुसार विकासाला मतदान करतील, असं बच्चू कडू म्हणालेत.
बेलोरा गावाची निवडणूक प्रतिष्ठेची नाही आहे.मागील 25 वर्षांपासून ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहे. आमचा उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येईल. प्रहारच्या सरपंचांची संख्य वाढेल असा विश्वास आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.
बेलोरा या बच्चू कडू यांच्या गावी पार पडणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत बच्चु कडू यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
आमदार देवेंद्र भुयार यांच्याही गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रंगतदार असणार आहे. त्यामुळे बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. 252 पैकी 5 ग्रामपंचायत अविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित 247 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 3 लाख 51 हजार 368 मतदार मतदान करतील.
15 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात 252 ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत थेट राजकीय पक्षांची ‘एन्ट्री’ नसली तरी गावा-गावातील पॅनल हे कोणत्या तरी राजकीय पक्षाशी निगडित आहे. 14 तालुक्यांत ही निवडणूक होत आहे. 835 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.तर आज 252 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येत आहे.