अमरावती : अमरावतीकरांसाठी एक खूशखबर आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत आता तयार होणाराय. जुनी इमारत 1871 मध्ये तयार करण्यात आली होती. तेव्हापासून जिल्हाधिकारी कार्यालय तिथंच आहे. आता तब्बल 151 वर्षानंतर अमरावतीचं जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत नवी होणाराय. यासाठी 28 कोटी 36 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी ( Construction) सार्वजनिक बांधकाम विभागानं (Public Works Department) निविदा बोलाविल्या आहेत. वर्कआर्डर दिल्यानंतर दोन वर्षांत ही नवी इमारत बांधण्यात येणाराय. पाच मेपर्यंत निविदा उपलब्ध राहणार आहेत. 28 एप्रिलला सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील मुख्य अभियंता कार्यालयात बैठक घेतली जाणाराय. सात मे रोजी निविदा उघडल्या जातील. नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत कंत्राटदारांकडून ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्यात.
1905 मध्ये अमरावती जिल्हा निर्माण झाला. 1956 मध्ये अमरावती जिल्हा मुंबई राज्याचा भाग होता. आता अमरावतीमध्ये पाच जिल्ह्यांचे महसूल आयुक्तालयाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. जिल्ह्याची वाढती लोकसंख्या बघता विद्यमान कार्यालय अपुरे पडत आहे. अनेक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विखुरलेली आहेत. ती सर्व कार्यालये नवीन इमारतीत एकाच छताखाली येणार आहेत.
सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूस नवी इमारत साकारली जाणाराय. इमारतीचे बांधकाम 7271 चौरस मीटर राहणाराय. त्यामध्ये पार्किंग, लिफ्ट, सुसज्ज दालन, पेयचलाची उत्तम व्यवस्था राहणार आहे. कंत्राटदार लवकर निश्चित झाल्यास 2024 ला जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी इमारत तयार होईल.
तब्बल 151 वर्षांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत नवी तयार होणार आहे. जुनी इमारत तशीच ठेवून नवीन इमारत तयार करण्यात येणार आहे. या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 28 कोटी रुपयांचं बजेट तयार करण्यात आलंय. जी प्लस फोर अशी ही नवीन इमारत राहणार आहे. 11 एप्रिलपासून या इमारतीच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.