अमरावती : अमरावतीत (Yogesh Gharad Amravati Firing) शनिवारी रात्री खळबळजनक घटना घडली. शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नागपूरलाही आणण्यात आलं. योगेश घारड (Yogesh Gharad) यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. योगेश घारड हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा क्षेत्रातचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आहेत. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. गोळीबार झाल्यानंतर एकच गर्दीही घटनास्थळी जमली. वरुड शहरातील मूलताई चौकात योगेश घारड वर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. अज्ञातांनी केलेल्या या गोळीबारानंतर अमरावतीत (Amravati firing) तणावपूर्ण शांतता पसरली होती. एकीकडे मुंबईत अमरावतीचे दिग्गज राजकीय नेते राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक यांच्या मुंबईत संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर तिकडे अमरावतीत झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यावरील हल्ल्यामुळे अमरावतीचं राजकारणही ढवळून निघालंय.
सुरुवातीला हा हल्ला अज्ञातांनी केला असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर आता हा हल्ला राहुल तडस नावाच्या व्यक्तीनं केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. गोळीबारानंतर हल्लेखोराचा पाठलागही करण्यात आला.
योगेश घारड यांच्यासोबत असणारे नंदू काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्लेखोरोचा पाठलाग करुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर पसार झाला. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घडना घडली होती. या हल्ल्यामध्ये योगेश यांच्या मांडीला गोळी लागून ते जखमी झाले.
योगेश घारड यांच्यावर प्राणघातक हल्ला का करण्यात आला, असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे. योगेश घारड यांच्यावरहील हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान योगेश घारड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर वरुड शहरात तणाव होता.
वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलिसांनीही तत्काळ बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणा ठेवण्यासाठी खबरदारी बाळगली. दरम्यान, आता हल्लेखोराला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.