अमरावती आग प्रकरण! व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे नाही तर मग कशामुळे दगावलं बाळ? डॉक्टरांनी सांगितलं
अमरावतीमधील आग प्रकरणी मृत्यू झालेल्या बाळाबद्दल डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती! नेमकं काय म्हणाले डॉक्टर?
स्वप्निल उमप, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात (Amravti Hospital Fire) अति दक्षता कक्षामध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली होती. या नंतर दोन शिशुंना जवळच्याच सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.मात्र दुर्दैवाने रात्री 11 दिवसांच्या शिशूचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या मृत्यूबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे (Dr. Dilip Saundale) यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. सदर मृत्यू झालेली शिशु (New born baby died) कमी दिवसांची आणि कमी वजनाची होती. गेल्या 10 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असलेल्या या बालिकेवर उपचार सुरु होते, असं डॉक्टरांनी म्हटलंय.
मृत्यू झालेल्या बालिकेची प्रकृती आधीपासूनच चिंताजनक होती. मात्र आधीच्या घटनेत त्या बालिकेचा मृत्यू झाला नाही. मृत्यू झालेल्या बालकाबाबत पालकांनाही कळवलं होतं, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी दिलीय.
पाहा लाईव्ह घडामोडी : Video
दरम्यान, रुग्णालयात आगीच्या घटनेनंतर आज माजी पालकमंत्री आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनीही प्रतिक्रिया दिली. रुग्णालयात मृत्यू झालेल्या शिशुच्या मृत्यूचं कारण काय आहे, हे तपासलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. शिवाय अशा घटना वारंवार होत असून हे अतिशय दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलं.
रुग्णालयाची इमारती जुनी आहे. इलेक्ट्रिक वायरींग जुन्या आहेत. त्यावर भर टाकला पाहिजे. या ठिकाणी खूप तक्रारी येतात. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने बघितलं पाहिजे. माहिती लपवण्याचा प्रयत्न केला असेल तर ते चुकीचं आहे. कुणाचा दोष असेल तर कारवाई केली पाहिजे, असं आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय.
रविवारी अमरावतीच्या रुग्णालयात आग लागली होती. त्यानंतर तातडीने रुग्णालय प्रशासनाने अग्निशमन दलाला कळवलं. आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत वॉर्डमधील रुग्णांना लगेचच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. व्हेंटिलेटरचा स्फोट होऊ आग भडकली होती. शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवली जात होती.