स्वप्नील उमप, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी, अमरावती | 03 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अमरावती मतदारसंघावर दावा केला. अमरावतीतून प्रहारचा नेता निवडणूक लढवेल, असं आज सकाळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना बच्चू कडू यांनी हा दावा केला. त्यानंतर आता प्रहारचा बडा नेता बच्चू कडू यांची साथ सोडणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. आमदार रवी राणा यांनी तसा दावा केला आहे. शिवाय हा बडा नेता शिवसेना किंवा भाजपसोबत जाऊ शकतो, असंही रवी राणा म्हणालेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहे.
प्रहारचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडूंची साथ सोडणार का?, अशी चर्चा सध्या होत आहे. आमदार रवी राणा यांनी तसा दावा केला आहे. राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राजकुमार पटेल यांची स्वतः ची मतदारसंघात पकड आहे. वैयक्तिक त्यांची पकड चांगली असल्याने ते आमदार झाले, असं राणा म्हणाले.
राजकुमार पटेल आता वेगळ्या वाटेवर आहेत. हे त्यांनाही माहित आहे आणि मलाही माहिती आहे. भाजपची तिकीट मिळाली पाहिजे हे राजकुमार पटेल यांना वाटतंय, असा दावा रवी राणा यांनी केला आहे. राजकुमार पटेल यांचा भाजपकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे कल आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी कुठलाही बदल होऊ शकतो, असं राणा म्हणालेत.अमरावतीची जागा आम्ही मागणार आहोत. हवं तर नवनीत राणा यांनी आमच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, असं बच्चू कडू यांना सकाळी म्हटलं. त्यानंतर रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपापल्या लोकांना सांभाळून ठेवलं पाहिजे. आपलीच जागा राखून ठेवली पाहिजे. आपली जागा जर धोक्यात असेल तर आपण दुसऱ्यांचा विचार करू शकत नाही. बच्चू कडू लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला ताकदीने साथ देतील. आम्ही देखील विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना ताकदीने साथ देऊ, असंही रवी राणा यांनी यावेळी म्हटलं.