‘अमरावती ते अजमेर’ विशेष ट्रेन, नवनीत राणा यांची मागणी मान्य; शिवसेनेचा जबर टोला
हनुमान चालिसासाठी आग्रह करणाऱ्या नवनीत राणा यांचे हे का हिंदुत्व अशी खोचक टीका या माध्यमातून करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी ट्वीट करत नवनीत राणा यांना डिवचलं.
अमरावती : अजमेरमध्ये (Ajmer) होणाऱ्या 811 व्या उर्ससाठी रेल्वे सुरू झाली. या अमरावती-अजमेर विशेष रेल्वेला खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी हिरवी झेंडी दाखवली. पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील भाविक रवाना झालेत. अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनरून विशेष रेल्वे गाडी सुटली. खासदार नवणीत राणा यांनी रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. 18 डब्याची ही विशेष रेल्वे आहे. यासंदर्भात ठाकरे गटाच्या प्रवक्या मनीषा कायंदे यांनी ट्वीट केलं.
जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर, अशा आशयाचं ट्वीट मनीषा कायंदे यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून केलं. यासोबत त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना खासदार नवनीत राणा यांनी लिहिलेलं पत्रही ट्वीट केलं.
जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर……. pic.twitter.com/WVZs21PfaX
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) January 26, 2023
उर्सचा अतिरिक्त खर्च
खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी लिहिले की, अमरावती क्षेत्रातून मोठ्या संख्येने भाविक अजमेरला उर्ससाठी जातात. अमरावतीवरून अजमेरला जाण्यासाठी ट्रेन नाही. भाविकांना अजमेरला जाण्यासाठी अडचण होते. भाविकांवर या उर्सचा अतिरिक्त खर्च पडतो.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचलं
२६ जानेवारीला अमरावती ते अजमेर तर परत ३० जानेवारीला अजमेर ते अमरावती अशी विशेष ट्रेन सुरू करण्याची मागणी नवनीत राणा यांनी केली होती. ट्रेनमध्ये एसी, स्लीपर तसेच सामान्य बोग्या लावण्यात याव्या, असंही पत्रात म्हटलं होतं. त्यांची ती मागणी मान्य करण्यात आली. त्यानंतर मनीषा कायंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नवनीत राणा यांना डिवचलं.
हनुमान चालिसासाठी आग्रह करणाऱ्या नवनीत राणा यांचे हे का हिंदुत्व अशी खोचक टीका या माध्यमातून करण्यात आली आहे.