खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट, युवकावर करण्यात आली अशी कारवाई
महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल अशी पोस्ट केल्याने युवकाविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाच्या कलमासह गंभीर गुन्हे दाखल केले.
अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या विरुद्ध एक पोस्ट फेसबूकवर व्हायरल झाली. बडनेरा येथील मंगेश चव्हाण या युवकाने फेसबुक या सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचं समोर आलं. या संदर्भात नवनीत राणा यांच्या समर्थकाने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बडनेरा पोलिसांनी नवनीत राणा यांची बदनामी केल्याप्रकरणी अश्लील व महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा संबंधित युवकाविरोधात नोंदविला. तसेच महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल अशी पोस्ट केल्याने युवकाविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाच्या कलमासह गंभीर गुन्हे दाखल केले.
नवनीत राणा यांनी युवा सेनेचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध विधान केलं होतं. त्याला उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या समर्थकाने नवनीत राणा यांच्या विरोधात पोस्ट टाकली. त्यात ही पोस्ट आक्षेपार्ह असल्याने तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी ही कारवाई केली.
ठाकरे घराणे आणि राणा घराणे यांचा राजकारणात छत्तीसचा आकडा आहे. ठाकरे आणि राणा दाम्पत्य एकमेकांवर आरोप करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. अशात सोशल मीडियावर बदनामी करणे युवकाला चांगलेच भोवले.
फेसबूकवर नवनीत राणा यांच्याविरोधात पोस्ट करण्यात आली. त्यानंतर राणा समर्थक थेट पोलीस ठाण्यात गेले. तिथं त्यांनी गुन्हा नोंदविला. त्यानंतर संबंधित युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळं सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करताना भान ठेवणे आवश्यक आहे.