अमरावती : संभाजी भिडे गुरुजी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर अमरावतीच्या राजकमल चौकात काँग्रेसने आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधात अपशब्द वापरले. असा आरोप शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी केला आहे. त्यानंतर ते अमरावतीच्या कोतवाली पोलीस ठाण्यात यशोमती ठाकूर यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आले. त्यांच्यासोबत भाजपचे खासदार अनिल बोंडे हेदेखील पोलीस ठाण्यात पोहचले. अनिल बोंडे म्हणाले, संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधात काँग्रेसने काल आंदोलन केलं. त्यावेळी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी न शोभणारे वक्तव्य केलं. भिडे गुरुजी यांना या हरामखोराला लाता मारून हाकललं पाहिजे. नालायक अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी शिव्या दिल्या. संतांसमान असणाऱ्या भिडे गुरुजी यांना मानणारे सगळ्या लोकांच्या भावना दुखावल्या.
लोकशाहीमध्ये आंदोलन करायला हरकत नाही. पण, यशोमती ठाकूर यांना कुणाला शिव्या देण्याचा अधिकार नाही. कुणाला हरामखोर म्हणण्याचा अधिकार नाही. भिडे गुरुजी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हे उठतात. विधानसभेत वंदे मातरम म्हणणार नाही. भारत माता की जय म्हणणार नाही. असं म्हणणाऱ्या अबू आझमी यांच्याविरोधात यांचं तोंड का शिवलेलं असतं. सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांचं तोंड बंद असते.
देशप्रेमाचे धडे देणाऱ्याला नालायक, हरामखोर का म्हणता, असा सवाल अनिल बोंडे यांनी विचारला. यशोमती ठाकूर यांच्याविरोधात शांततेने गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी आम्ही पोलीस ठाण्यात आल्याचं खासदार अनिल बोंडे म्हणाले. भिडे गुरुजी महात्मा गांधी यांच्या विरोधात काही बोलले असतील, तर त्याचं समर्थन आम्ही करत नाही. भिडे गुरुजी यांनी एका पुस्तकातले उतारे वाचून दाखवले. पण, म्हणून यशोमती ठाकूर यांनी भिडे गुरुजींच्या विरोधात अशोभनीय शब्दप्रयोग करण्याचा अधिकार नाही, असंही अनिल बोंडे म्हणाले. समाजाचे वातावरण दूषित करण्यासाठी यशोमती ठाकूर या सातत्याने प्रयत्नशील असतात, असाही आरोप अनिल बोंडे यांनी केला.
महात्मा गांधी यांच्या विरोधात बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही. यशोमती ठाकूर यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी खासदार अनिल बोंडे हे पोलीस ठाण्यात पोहचले. यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे विरोधात अपशब्द वापरले. त्यामुळे अनिल बोंडे आक्रमक झालेत. शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांसोबत अनिल बोंडे हे अमरावतीच्या पोलीस ठाण्यात पोहचले.