अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी रंगपंचमीच्या निमित्ताने आगळा वेगळा उपक्रम राबवला. बच्चू कडू यांनी रंगपंचमी निमित्ताने जिल्हा परिषदेची शाळा रंगवली. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील कुरळ पूर्णा येथील शाळेत बच्चू कडू यांनी रंगरंगोटी केली. शाळेला रंग देत बच्चू कडू यांच्याकडून होळी साजरी करण्यात आली. रंगपंचमीनिमित्ताने बच्चू कडू यांनी हा उपक्रम राबवला. चांदुरबाजार तालुक्यातील कुरळ पूर्णाच्या शाळेला रंगरंगोटी केली आहे. शाळेला रंग देत बच्चू कडू यांच्याकडून रंगपंचमी साजरी करण्यात आली. बच्चू कडू म्हणाले, सुतकात काय करता येईल, याचा विचार केला. त्यावेळी आमचं गाव रंगवलं. त्या दुःखातून ही संकल्पना आली. एकमेकांना रंगवताना गाव रंगवता येईल का. शाळा रंगवता येईल का. झाडं रंगवता येईल का. याला राष्ट्रीय स्तरावर कसं नेता येईल. याला सार्वजनिक स्वरुप कसं प्राप्त करता येईल.
आम्ही नुसतं शाळेला रंग भरत नाही. तर विद्यार्थ्यांच्या जीवनात रंग भरतो. या शाळेला आदर्श शाळा बनवण्याचं काम करू. बेलोरा येथील शाळा रंगवली होती. आता बेलोरा शाळा आदर्श शाळा झाली आहे. आता कुरळपूर्णा येथील शाळा रंगवत आहोत. या शाळेलाही आदर्श शाळा करण्याचा प्रयत्न करू. चांगले खासगी शिक्षक लावता येईल का. ही शाळा दत्तक घेऊन ही शाळा समोर नेण्याचा प्रयत्न करू, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.
मुस्लीम असेल तर तो मशिदीवर रंग मारतो. हिंदू असेल तर तो मंदिरासाठी काहीतरी करतो. बौद्ध असेल तर तो बौद्ध विहारासाठी करतो. शाळा ही गावाची आहे, हे लोकांच्या लक्षात आलं नाही. हा छोटासा उपक्रम आहे. पण, यानिमित्तानं लोकं येथे आले. जात, धर्म सोडून सगळ्यांची मुलं येथे शाळेत येतात. शाळेत जाती, धर्माचा रंग नसतो. देशाचा रंग उधळला जातो, असंही बच्चू कडू यांनी म्हंटलं.