तुम्ही पाकिस्तानमध्ये राहता की, परदेशात?, देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांना असं का म्हणाले?
मेळघाट वीज प्रश्नावर महावितरणच्या अधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले.
स्वप्निल उमप, TV9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज अमरावती जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकारी आणि पदाधिकारी यांची बैठक घेतली. अमरावती मनपाची वाढवलेली कर वाढीला स्थगिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. 2002 पासून तुम्ही कर वाढवला नाही. आता तुम्ही कर वाढवला. लोकं झाडावरून तोडून आणतील का पैसे, असा सवाल फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना विचारला. एकावेळी एवढा कर वाढवला आहे. सध्या त्याला स्थगिती द्या, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी मनपा आयुक्तांना दिले.
काही अधिकारी अभ्यास न घेता बैठकीला आले होते. हे यापुढं खपवून घेतलं जाणार नाही, असा दम फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिला. तुम्ही काही अधिकारी लोकं फार हुशार आहात. मी 25 वर्षे घालवलेले आहेत. मला आवरेजचे सांगू नका, असंही त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.
मेळघाटमधील अजूनही 24 गावांत लाईट नाही. त्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा व आमदार राजकुमार पटेल यांनी अमरावतीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली. दहा पंधरा मुख्यमंत्री बदलले. पण अजून हा प्रश्न प्रलंबित आहे, असं आमदार बच्चू कडू म्हणाले.
यावेळी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरं मिळालं नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तुम्ही पाकिस्तानमध्ये राहता की परदेशात राहता. मेळघाट वीज प्रश्नावर महावितरणच्या अधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले. आठ दिवसांत यावर बैठक लावा आणि तोडगा काढा, असेही फडणवीस यांनी अधिकाऱ्यांनी आदेश दिले.