National Highway | लोणी ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर सतत पाच दिवस रस्ता बांधकाम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार
यंत्रसामग्रीसह 728 मनुष्यबळ कार्यरत असतील. यंत्रसामग्री सतत कार्यरत आणि दोषमुक्त ठेवण्यासाठी, टाटा मोटर्सचे 5 इंजिनिअर आणि अन्य 5 अधिकारी येथे तैनात आहेत. ही चमू त्या यंत्रांवर सतत लक्ष ठेवून आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून, रस्ता निर्मितीचा हा विक्रम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अमरावती : अमरावती ते अकोला या दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर, लोणी ते मूर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाचे काम 3 ते 7 जून दरम्यान सुरू होणाराय. चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने तीन जूनला सकाळी सहा वाजतापासून ते सात जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत, बिटुमिनस काँक्रिटच्या जगातील सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम करण्यात येणाराय. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, त्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होईल. ही कंपनी जशी नियोजित वेळेत आणि गतीने काम करण्यासाठी सुविख्यात आहे, तशीच दर्जा (Quality) आणि मानवी सुरक्षिततेसाठीसुद्धा ( human Safety) प्रसिद्ध आहे. त्यासाठी कोणत्याही साईटवर त्यांची गुणवत्ता नियंत्रण अभियंते आणि तंत्रज्ञ तसेच सुरक्षितता अधिकारी यांची चमू सतत कार्यरत असते. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून वापरल्या जाणारे मटेरियल आणि करण्यात येत असलेले काम यावर सतत निगराणी ठेवून कामाचा दर्जा राखला जातो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या निर्धारित दर्जाप्रमाणेच हे काम होईल याकडे लक्ष्य दिले जाते.
728 मनुष्यबळ कार्यरत
राज पथ इन्फ्राकॉनचा हा धाडसी प्रयत्न गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होणार आहे. तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया (NHAI) द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत पूर्ण केला जाईल. त्यासाठी 728 मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे. तज्ज्ञ चमूचे कामावर लक्ष राहील. कामाच्या दर्जाची प्रयोगशाळेतून तपासणी देखील करण्यात येणार आहे. या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राज पथ टीमने सूक्ष्म नियोजन केले आहे. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. यात प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्लालिटी इंजिनिअर, सर्व्हेअर, सेफ्टी इंजिनिअर आणि अन्य कर्मचारी यांची चमू तैनात करण्यात आली आहे. त्या या महामार्गावरच, माना कॅम्प येथे व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली आहे. यात 4 हॉट मिक्सप्लांट, 4 व्हीललोडर, 1 पेव्हर, 1 मोबाईल फिडर, 6 टँडेम रोलर, 106 हायवा, 2 न्युमॅटीक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह 728 मनुष्यबळ कार्यरत असतील.
यापूर्वीचे विक्रम मोडणार
राज पथ इन्फ्राकॉनने सांगली- सातारा दरम्यान,पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान, सतत 24 तास रस्ता तयार करीत विश्वविक्रम स्थापित केला होता. सार्वजनिक कार्य प्राधिकरण- अश्गुल यांनी दोहा, कतार येथे यापूर्वी विक्रम नोंदविला होता. यात त्यांनी सुमारे 242 तास म्हणजेच 10 दिवस नॉनस्टॉप बांधकाम करून, 25 किलोमीटर रस्ता निर्मितीचा विक्रम केला होता. राज पथ इन्फ्राकॉनने आता तो रेकॉर्ड मोडण्याचा चंग बांधला आहे. लोणी-मूर्तीजापूर दरम्यान, विश्वविक्रम रचण्याचा प्रयत्न राहणार आहे. ही आव्हानात्मक कामगिरी यशस्वी झाल्यास, राज पथ इन्फ्राकॉन प्रा. लि. या रस्ते बांधकाम क्षेत्रातील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदवणारी पहिली भारतीय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल.