Amravati | गुरुकुंज मोझरीतील भोंग्यावर ध्यानाची 80 वर्षांची परंपरा खंडित; गुरुदेव भक्तांची नाराजी
अखिल विश्वाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीमधील आश्रम 80 वर्षापासून भोंग्यावर ध्यान म्हणण्याची परंपरा आहे.
अमरावती : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधी मशीद आणि नंतर मांदिरावरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. न्यायालयाने आदेश दिल्याने राज्यातील अनेक महत्वाच्या मंदिरातील आरत्या या भोंग्याविना पार पडत आहेत. अशातच सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रममधील ( Gurukunj Ashram) महाद्वारावर असलेल्या भोंग्याची परंपरा इतिहासात पहिल्यांदा खंडित झाली आहे. पहाटे प्रार्थना मंदिरात होणारे सामुदायिक ध्यान आज भोंग्याविना पार पडले. स्थानिक गुरुदेव भक्तांनी (Gurudev devotees) नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू असे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे. गेल्या 80 वर्षांची ध्यानाची परंपरा (tradition of meditation) आहे. या निर्णयाने ही परंपरा आज खंडित झाली.
गुरुकुंज मोझरीत सकाळी सामुदायिक ध्यान
अखिल विश्वाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीमधील आश्रम 80 वर्षापासून भोंग्यावर ध्यान म्हणण्याची परंपरा आहे. सकाळी सामुदायिक ध्यानाअगोदर तुकडोजी महाराजांच्या आवाजातील भजने व अभंगाच्या माध्यमातून परिसरात प्रसन्नता निर्माण केली जाते. त्यामुळे पंचक्रोशीमधील अनेक लोकांची पहाट सामुदायिक ध्यानाने होते.
आश्रमातील भोंगे चालू करावे
परंतु, राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर न्यायालयाने भोंग्यांवर काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे तुकडोजी महाराजांच्या आश्रमातील भोंगादेखील आता बंद झाला आहे. आज सकाळचे सामुदायिक ध्यान भोंग्याविना पार पडले आहे. त्यामुळे परिसरामध्ये सकाळी शांतता झाली होती. दिवसाची सुरुवात आम्ही महाराजांच्या आश्रमातील सामुदायिक ध्यानाने करतो, अशी प्रतिक्रिया अनेक गुरुदेव भक्तांनी दिली. त्यामुळे कुठलीही अट न ठेवता तुकडोजी महाराजांच्या आश्रमातील भोंगे चालू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.