मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचे समर्थक आमदार बच्चू कडू केंद्रीय अर्थसंकल्पावर नाराज, म्हणाले…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी घोषित केलेल्या अर्थसंकल्पावर शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) समर्थक आणि प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अमरावती : केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget 2023-24) आज अनेक मोठ्या घोषणा करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने नोकरदारांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत ज्या नोकरदारांचं वार्षिक वेतन पाच लाखापेक्षा जास्त होतं त्यांना कर भरावा लागत होता. पण नव्या अर्थसंकल्पानुसार आता सात लाखांपर्यंत वार्षिक वेतन असणाऱ्या नोकरदारांना करात सूट देण्यात आली आहे. याशिवाय केंद्र सरकारकडून अनेक गोष्टींसाठी दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रासाठी भरीव रकमेची तरतूद केली आहे. पण या अर्थसंकल्पावर शिंदे सरकारच्या समर्थक आमदाराने नाराजी व्यक्त केलीय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी घोषित केलेल्या अर्थसंकल्पावर शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) समर्थक आणि प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात गरिबांच्या घराचे निकष बदलायला हवे होते. तसेच अर्थसंकल्प हा हिंदीत सादर करायला हवा होता, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
“आता जे आलेलं अर्थसंकल्प आहे ते निश्चितच चारही बाजूने विचार करणारं आहे. पण मला असं वाटतं की, गरिबाच्या घराच्या बाबतीत निकष बदलण्याची आवश्यकता आहे. शहर आणि ग्रामीण यांच्यातील जो तफावत आहे तो भरुन काढण्याचा अर्थसंकल्प यायला पाहिजे होता. तशा तरतुदी होणं गरजेचं होतं”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
“कोरडवाहू शेतीसाठी काहीही कार्यक्रम नाहीय. फलोत्पादक शेतकरी, बागायतदार शेतकरी यांच्यासाठी तरतूद झालेली दिसते”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
“दोन-तीन गोष्टी चांगल्या आहेत. नर्सिंग कॉलेजबद्दल चांगली घोषणा झालीय”, अशीदेखील प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘अर्थसंकल्प हिंदी भाषेत सादर करायला हवा होता’
“एक दु:खाची गोष्ट अशी आहे की, आपल्या भारताची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे. हिंदुस्तानात हिंदीमध्ये अर्थसंकल्प मांडायला पाहिजे होता. कारण भाजपची ही संस्कृती आहे. देशाची संस्कृती घेऊन आपण पुढे जात असतो. केंद्राचा नेहमी प्रचार राहिलाय की, हिंदीचा वापर करा. आपली राष्ट्रीय भाषा हिंदी आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
‘मला वाटलं मी इंग्लंडच्या संसदमधील भाषण ऐकतोय की काय?’
“आम्ही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना पत्र पाठवणार आहोत. हिंदीतही अर्थसंकल्प सादर व्हायला हवा. निदान सुरुवात तरी हिंदीत करायला हवी. मला वाटलं मी इंग्लंडच्या संसदमधील भाषण ऐकतोय की काय?”, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.