अमरावती : अमरावतीत उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची हत्या करणारा गुन्हेगार आहेच मात्र त्यासोबतच ही घटना दाबण्याचा प्रयत्न करणारेही गुन्हेगार आहेत, असे वक्तव्य खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केले आहे. त्या अमरावतीत बोलत होत्या. मेडिकल स्टोअर्स चालवणाऱ्या उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी हत्या करण्यात आली. भाजपाच्या वादग्रस्त नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ कोल्हेंनी पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्यांचा खून करण्यात आला. त्यातील आरोपींना अटकही करण्यात आली आहे. एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी नवनीत राणा यांनी उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची आज भेट घेतली. त्यावेळी त्यांनी माजी पालकमंत्री यांच्यासह सीपींवरही प्रकरण दाबल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मागील 12 वर्षांपासून मी अमरावतीत राहते. अमरावती माझे सासर आहे. मात्र अशाप्रकारची घटना मी कधी पाहिली नाही. अमरावती शांत शहर होते. सर्वजण एकतेत राहत होते. हे पोलीस आयुक्तांचे अपयश आहे. आधी याठिकाणी दंगली झाल्या, लोकांवर दगडफेक करण्यात आली, त्यावेळीदेखील येथे कायदा-सुव्यवस्था निर्माण झाली होती. त्यावेळीदेखील त्यांचे अपयश होते, असा आरोप त्यांनी पोलीस आयुक्तांवर केला आहे. आणखी काही जणांना वेगवेगळ्या नंबरवरून धमक्या येत आहेत. आम्ही अमरावती सोडून जातो, असे धमक्या मिळालेल्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी विचार करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
उमेश कोल्हे (54) यांचे मेडिकल स्टोअर्स आहे. 21 जून 2022ला कोल्हे रात्री उशिरा आपल्या मेडिकलमधून घरी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. घरी परतत असताना या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यातच गाठले आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार करत त्यांची हत्या केली. वादग्रस्त भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.