Amravati | नवोदित युटुबर्सचा पालकमंत्री ठाकूर यांनी केला सत्कार; सेल्फीही घेतली, विजय खंडारे कसा झाला फेमस?
शेंगा विकणारा, मोलमजुरी करून पोट भरणारा विजय खंडारे. पण, आज तो युटुबर्स म्हणून फेमस झाला. याची दखल पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी घेतली.
अमरावती : श्री वल्ली गाण्याचे मराठी रिमेक करणाऱ्या कलावंताचा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर (Guardian Minister Thakur) यांनी सत्कार केला. विजय खंडारे (Vijay Khandare) या हरहुन्नरी कलाकाराच्या भावी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या अनपेक्षितपणे झालेल्या सत्कारामुळे विजय खंदारे हा कलावंत आणि त्याची पत्नी भारावून गेली. पुष्पा या दाक्षिणात्य चित्रपटातील श्री वल्ली गाणे सध्या अतिशय धुमाकूळ घालीत आहे. मात्र त्यापेक्षा त्याचे मराठी रुपांतरण सध्या युट्युबवर अतिशय गाजत आहे. हे रूपांतर अमरावती जिल्ह्यातील निंभोरा बैलवाडी येथील विजय खंदारे या तरुणाने केले आहे. सध्या दिवसा येथे राहणाऱ्या विजय खंदारे याच्या या कलागुणांचा गौरव करीत पालकमंत्री ठाकूर यांनी त्यांची भेट घेतली. पत्नी तृप्तीसह विजय खंदारे याचा सत्कारही केला.
असा झाला विजय खंडारे फेमस
गरिबीतून आपले शिक्षण पूर्ण करीत नोकरीसाठी भटकणाऱ्या विजयने प्रसंगी शेंगा विकल्या. तसेच मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची गुजराण केली. याच दरम्यान त्याला टिक टॉकवर व्हिडिओ करण्याचा छंद लागला. त्याने केलेल्या विनोदी व्हिडिओना चांगला प्रतिसाद मिळाला. त्याने स्वतःचे युट्युब चॅनेल सुरू केले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा कलावंतांनी आपल्या कलागुणांची जोपासना करावी, असे आवाहन पालकमंत्री ठाकूर यांनी केले आहे.
पालकमंत्र्यांच्या सत्काराने भारावले विजयचे कुटुंबीय
विजयला त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास सहकार्य करण्याचे आश्वासनही ठाकूर यांनी यावेळी दिले. एखाद्या कलावंताची कदर करीत त्याचा यथोचित सन्मान करणाऱ्या ठाकूर यांच्या या कृतीमुळे विजय खंदारे आणि त्याचे कुटुंबीय भारावून गेले होते. आता तर विजय फेसबूक लाईव्ह करायला लागला. ज्या स्टुडियोत त्याने हे गाण शूट केलं. तिथून त्यानं फेसबूक लाईव्ह केलं. त्यानं पहिल्यांदाच अशाप्रकारच्या स्टुडियोचा वापर केला. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या माईकसमोर गाण म्हटल्याचं विजयनं सांगितलं.