सुषमा अंधारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन; ही खबरदारी घेण्याची वारकरी संप्रदायाची मागणी
सुषमा अंधारे, आयोजकास लेखी समज देण्यात यावी. आमचा शिव जयंती व व्याख्यानाला कुठलाही विरोध नाही. पण त्यांनी केलेल्या भाषणातून हिंदू देव देवतांचे विडंबन व अपमान होणार नाही.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात येत्या 20 फेब्रुवारी रोजी शिव जयंती निमित्त (Shiv Jayanti) कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त शिव व्याख्यान आयोजित करण्यात आलंय. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे व्याख्याता आहेत. सुषमा अंधारे (Sushma Andhare) या नेहमी हिंदू देवी देवतांचे विडंबन करतात. अपमानास्पद व खोटे पुरावे देऊन बोलतात. असा आरोप अखिल भारतीय वारकरी संप्रदायने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे, आयोजकास त्याबाबत लेखी समज द्यावी. अशा आशयाचे निवेदन पोलीस स्टेशन ठाणेदार यांना अखिल भारतीय वारकरी मंडळ, मराठी राज्य वारकरी महामंडळ, बजरंग दल चांदूर रेल्वे यांनी दिले.
अंधारे यांचे वक्तव्य तेढ निर्माण करणारे
गेल्या काही महिन्यात सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रातील थोर संत ज्ञानेश्वर महाराज व संत एकनाथ महाराज यांच्या बद्दल अभद्र वक्तव्य केलीत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. चांदुर रेल्वे तालुका हा वारकरी संप्रदायाचा म्हणून ओळखला जातो. हे मुख्य कारण लक्षात ठेवता त्यांचे बरेच व्हिडिओ धर्म व जाती मध्ये तेढ निर्माण करणारे असतात, असं वारकरी संप्रदायाचं म्हणण आहे.
अराजकता निर्माण होऊ नये
बऱ्याच ठिकाणी सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल पोलीस तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे चांदुर रेल्वे शहरातही त्यांच्या वक्तव्याने अशांतता व अराजकता निर्माण होऊ नये. त्यांच्या भडकाऊ वक्तव्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडू नये.
लेखी समज देण्याची मागणी
हिंदू जन माणसांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहचू नये. त्याकरिता कार्यक्रमापूर्वीच प्रमुख वक्त्या सुषमा अंधारे, आयोजकास लेखी समज देण्यात यावी. आमचा शिव जयंती व व्याख्यानाला कुठलाही विरोध नाही. पण त्यांनी केलेल्या भाषणातून हिंदू देव देवतांचे विडंबन व अपमान होणार नाही. शहरात अराजकता निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा आशयाचे निवेदन संघटनांनी दिले.
यांनी दिले निवेदन
हभप अक्षय महाराज हरणे, महाराष्ट्र राज्य वारकरी मंडळ तालुका अध्यक्ष चांदुर रेल्वे माजी नगरसेवक बच्चू वानरे, प्रावीण्य देशमुख, चेतन भोले, किरण शिवणकर, स्वरूप शेंडे, आकाश देशमुख, राम बावनथडे, सुनील मेश्राम, शुभम होले, आदित्य भैसे, मयूर मेश्राम, अथर्व श्रीखंडे, संजय शिंदे, विनोद वंजारी यांनी निवेदन दिले.
निवेदनाच्या प्रतिलिपी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी अमरावती, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना देण्यात आल्या आहेत.