“कारल्याले कारले येऊ दे ग सूनबाई, मग जाय आपल्या माहेरा”; मंत्रिमंडळाच्या विस्तारावर ही मिश्किल प्रतिक्रिया नेमकी कोणाची…
आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून पत्रकारांवरही त्यांनी जोरदार टोला लगावला आहे. विस्ताराबाबत बोलताना म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा होईल, तुम्ही कशाला एवढं मनावर घेता असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ला दौरा ठरल्यापासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा जोरदारपणे रंगू लागल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्या भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यापासूनही मंत्रिमंडळाच्या चर्चा झडू लागल्या आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप अशी युती असली तरी आता मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी निवडणुकांवरून दोन्ही पक्षामध्ये नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर त्यावरूनच आता प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळावर एक मिश्किल टिप्पणी केली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या त्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
आमदार बच्चू कडू दिव्यांग मंत्रालयासाठी पूर्वीपासून ते आग्रही आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर दिव्यांग मंत्रिमंडळावरून त्यांना छेडले असता त्यांनी राज्यातील शिवसेना-भाजप सरकारविषयी मिश्किलपणे मत व्यत केले आहे.
राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलताना त्यांनी सासू आणि सुनेचं उदाहरण देत वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, कारल्याले कारले येऊ दे ग सूनबाई, मग जाय आपल्या माहेरा; पण कारल्याला काही कारलं येत नाही आणि सुनबाई काही माहेरी जात नाही अशीच एकंदरीत व्यवस्था असल्याचा खोचक टोला त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर लगावला आहे.
आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून पत्रकारांवरही त्यांनी जोरदार टोला लगावला आहे. विस्ताराबाबत बोलताना म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा होईल, तुम्ही कशाला एवढं मनावर घेता असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी पत्रकारांना सल्ला देताना म्हणाले की, आता तुम्हीही विस्ताराच्या बातम्या दाखवणे बंद करा कारण जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा दिवसभर बातम्या दाखवत जा असंही त्यांनी मिश्किलपणे आपले मत व्यक्त केले.