Ravi Rana : सत्तेत असताना अजित पवारांनी मेळघाटचा दौरा का केला नाही?, राणा दाम्पत्याची अजित पवारांवर सडकून टीका
नवनीत राणा यांनी सांगितलं की, अजित पवार स्वतः कबूल करत आहेत की त्यांच्यामुळे कुपोषण कमी झालं नाही. मी कुपोषणाचा मुद्दा उचलला होता. महाराष्ट्रामध्ये अजित दादा यांची सत्ता होती. पालकमंत्री अमरावतीच्या होत्या.
अमरावती : काल राज्याचे विरोधी पक्ष नेते (Opposition Leaders) अजित पवार हे अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी मेळघाटातील कुपोषणाचा आढावा घेत आताच्या सरकारला जबाबदार धरले होते. कुपोषणाचा मुद्दा अधिवेशनात लावून धरू असेही पवारांनी काल सांगितलं होतं. आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. अजित पवार हे सत्तेत असताना त्यांनी मेळघाटचा दौरा का केला नाही, असा पलटवार त्यांनी केला. आता फक्त दोन महिने झाले आमची सत्ता आली. यापूर्वी अजित पवार झोपले होते काय असा सवाल राणा दाम्पत्याने उपस्थित केला. आता अजित पवार केव्हा कुपोषणाचा (Malnutrition) मुद्दा अधिवेशनात मांडतात, यांची वाट आम्ही पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली. मेळघाटातील बालकांना निकृष्ट दर्जाचा आहार (Poor Diet) दिला जातो. त्याची चौकशी सरकारने केली नाही. तसेच मी मेळघाटातील कुपोषणाचा मुद्दा लोकसभेत मांडला होता, असेही नवनीत राणा यांनी यावेळी सांगितले.
कुपोषणग्रस्तांना निकृष्ट आहार
महिला बाल विकास मंत्री या राज्यात अमरावती जिल्ह्याच्या होत्या. याच अमरावती जिल्ह्यात कुपोषणाच्या माध्यमातून 50 बालकं मरण पावले. कुपोषणाचा आहार हा निकृष्ट दर्जाचा दिला जात होता तेव्हा अजित पवार झोपले होते का, असा सवाल रवी राणा यांना विचारला. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी एक दौरा मेळघाटात केला नाही. यशोमती ठाकूर या मंत्री होत्या. त्यावेळी अजित पवारांनी ठाकूर यांच्यावर कारवाई केली असती, तर कदाचित 50 बालकांचे मृत्यू रोखता आले असते. अजित पवार यांनी राज्य सांभाळले. त्यावेळी त्यांनी अधिकारी आणि पालकमंत्री यांना पाठिशी घातलं. आता आदिवासींना भेटी देत आहेत. त्यावेळीच योग्य ती कारवाई करायला पाहिजे होती, असंही राणा म्हणाले.
पैसे खाणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे
नवनीत राणा यांनी सांगितलं की, अजित पवार स्वतः कबूल करत आहेत की त्यांच्यामुळे कुपोषण कमी झालं नाही. मी कुपोषणाचा मुद्दा उचलला होता. महाराष्ट्रामध्ये अजित दादा यांची सत्ता होती. पालकमंत्री अमरावतीच्या होत्या. तेव्हा का अजित दादा यांनी चौकशी बसवली नाही. जे मंत्री पैसे खातात, जे ठेकेदार पैसे खातात, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं नवनीत राणा म्हणाल्या.