अमरावतीत राणा दाम्पत्य बॅकफूटवर?, कायदा सुव्यवस्थेचं दिलं कारण, पुतळ्याचं राजकारण थांबलं?
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अमरावतीत राजकारण चांगलंच गाजलं. आता कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी एक पाऊल मागं घेतल्याचं खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं.
अमरावती : 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी शिवाजी महाराज यांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) बसविणार असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला होता. त्यामुळं अमरावती शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आज शिवजयंतीच्या दोन दिवसांपूर्वीच नवनीत राणा (Navneet Rana) यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार नाही. अमरावती महापालिकेमध्ये (Amravati Municipal Corporation) युवा स्वाभिमान पक्षाची सत्ता आल्यावरच आम्ही रीतसर परवानगी घेऊ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवू असं नवनीत राणा यांनी सांगितलं. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहली पाहिजे. कारण अमरावतीमध्ये 13 नोव्हेंबर रोजी मोठी दंगल घडली होती. या दंगलीत सर्वसामान्य माणसाचं मोठं नुकसान झालं होतं. आता आम्ही शांततेत सर्व गोष्टी घेणार आहोत. आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावर ठाम आहोत. ज्या ठिकाणाहून शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याच ठिकाणी पुतळा बसवू. पण, सध्यातरी नाही. अस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळं पुतळ्यावरून सुरू असलेले राजकारण तूर्तास थांबलेलं आहे.
रवी राणांसह अकरा जणांवर गुन्हे
अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यांना त्यांच्या घरातच नजर कैद मध्ये होते. तर यावेळी राणा दाम्पत्य यावेळी मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. गेल्या बुधवारी शिवाजी महाराजांचा पुतळा का हटवला म्हणून मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. त्यानंतर आमदार रवी राणा यांच्यासह अकरा जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. शाईफेक घटना घडली तेव्हा आमदार रवी राणा अमरावतीत नव्हते. तरीही रवी राणा यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत. तेव्हापासून रवी राणा हे फरार आहेत. त्यांना अटक करण्याच्या हालचाली पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहेत. तसेच आयुक्तांवर शाई फेकीचे पडसाद राणा दाम्पत्यांविरोधात उमटत आहेत.
राणा दाम्पत्याचे एक पाऊल मागे
19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीला शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच राजापेठ उड्डाणपुलावर बसवू असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला. मात्र त्यापूर्वीच मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. यामुळे आमदार रवी राणा अडचणीत आले आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्य बॅकफूटवर आलेत. राणा दाम्पत्याने एक पाऊल मागे घेतल्याचे आज घेतलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या पत्रकार परिषद मधून स्पष्ट झालंय. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या पर्वावर आमदार रवी राणा यांनी त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या राजापेठ येथील उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. मात्र तो पुतळा अनधिकृत असल्याने महापालिका प्रशासनाने 16 तारखेला तो पुतळा हटवला.