Amravati Shiv Sena : शिवसेनेचे अमरावतीत राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन, शिवसेनेच्या महिलांकडून बांगड्या फेकून निषेध
अमरावतीतील शिवसैनिकांच्या आंदोलनाला आज वेगळंच वळण मिळालं. आमदार रवी राणा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी या आंदोलन करण्यात आलं. यावेळी काही शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राणा दाम्पत्याच्या घरासमोर बांगळ्या फेकून निषेध व्यक्त केला.
अमरावती : अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले. आज शिवसैनिक रवी राणा यांच्या घरासमोर धडकले. पोलिसांनी बंदोबस्त केला होता. त्यामुळं शिवसैनिकांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, शिवसैनिक काही मानेना. सुमारे पाचशे शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या घरासमोर धडकले होते. तीनशेच्या जवळपास महिला कार्यकर्त्या होत्या. या महिलांचं नेतृत्व अमरावती जिल्ह्याच्या महिला जिल्हा प्रमुख वर्षा भोयर (Varsha Bhoyar) यांनी केलं. भोयर यांच्या नेतृत्त्वात महिलांना बांगड्या फोडून राणा दाम्पत्याच्या घोषणेचा निषेध केला. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याच्या घरासमोर बांगड्या फेकल्या. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे हाती घेतले होते. काही कार्यकर्त्यांनी हनुमानाची वेशभूषा धारण केली होती.
शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
शिवसैनिकांना रोखण्यासाठी राणा समर्थक त्यांच्या समोर उभे होते. राणा समर्थकांनी घरासमोर हनुमान चालीसा पठण केले. तसेच जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. मातोश्रीवर जाण्याचे स्वप्न पाहू नका, असा इशारा युवासेनेचे सागर देशमुख यांनी दिलाय. यावेळी पोलिसांनी सावध पवित्रा घेतला. शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना लगेच राणा दाम्पत्याच्या घरासमोरून हटविण्यात आले. खासदार नवनीत राणा या माध्यमासमोर आल्या. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाविकास आघाडीत येताच हिंदुत्वाची विचारधारा बदलविली आहे, अशी टीका केली.
मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याचा पुनरुच्चार
नवनीत राणा म्हणाल्या, हिंदुत्वाची बाळासाहेबांची विचारधारा ही राज ठाकरे पार पाडत आहेत. त्यामुळे ते लवकरच उद्धव ठाकरे यांची जागा घेतील. नवनीत राणा यांनी शिवसैनिकांसाठी सरबतची व्यवस्था केली होती. महाराजांना बोलाविले होते. हनुमान चालीसा सोबत म्हणू असंही ठरविलं होतं. पण, पोलिसांनी शिवसैनिकांना अटक केल्यामुळं आंदोलन शांत झालं. तरीही मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणू याचा पुनरुच्चार खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केला. मातोश्रीवर जाऊ बाहेरून आरती करू. संस्कृती रक्षणासाठी प्रयत्न करू. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या विचारधारेची आठवण करून देऊ, असं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.