Amaravati Leopard : वन विभागाच्या जवानाने नजदीक जाऊन बिबट्याला केले बेशुद्ध, पाहणाऱ्यांना घाम फुटला
अमोल गावनेर या जवानाने पंधरा फुटावरून बंदूकच्या साहाय्याने बेशुद्धीचे इंजेक्शन मारून बिबट्याला रेस्क्यू केले. आता तो बिबट्या वनविभागाच्या ताब्यात ठेवला आहे.
अमरावती : अमरावती शहरापासून (Amaravati city) जवळ असलेल्या पोहरा (pahara) गावामध्ये तीन ते चार दिवसांपासून एका बिबट्याने (Leopard) अक्षरशः थैमान घातले होते. गावातल्या अनेक शेळ्यांची त्याने शिकार केल्याच्या तक्रारी वनविभागाकडे आल्या होत्या. त्यानंतर वन विभागाने तात्काळ दखल घेऊन तिथं रेस्क्यू टीम पाठवली होती. रेस्क्यू टीममधील अमोल गावनेर या जवानाने बिबट्याला जवळ जावून बेशुद्धीचे इंजेक्शन बंदूकच्या साहाय्याने मारल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचबरोबर या घटनेचा व्हिडीओ सुध्दा सगळीकडे व्हायरल झाला आहे.
नेमकं काय झालं
पोहरा गावात बिबट्याने अनेक शेळ्यांना फस्त केल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यांनी तात्काळ या संबंधित घटनेची माहिती वन विभागाच्या रेस्क्यू टीमला दिली. टीम दाखल झाल्यानंतर त्यांनी बिबट्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. बिबट्या एका गव्हाच्या वावरात बसल्याची जवानाला खात्री झाली. त्यानंतर अमोल गावनेर या जवानाने पंधरा फुटावरून बंदूकच्या साहाय्याने बेशुद्धीचे इंजेक्शन मारून बिबट्याला रेस्क्यू केले. आता तो बिबट्या वनविभागाच्या ताब्यात ठेवला आहे. त्यामुळे आता पोहरा परिसरातील भीतीच्या वातावरणातून दूर झाले आहे.